६४ व्यावसायिकांना अटक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रसिद्ध कृष्णा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या जुगार पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६४ जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पालघरचे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे व्यावसायिक असून गुजरात आणि मुंबईतून आलेले होते.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा गावाच्या हद्दीत कृष्णा रिसॉर्ट आहे. तेथे जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीला कारवाई करून चार जणांना ताब्यात घेतले होते. मात्र पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना माहिती मिळताच त्यांनी विशेष पथक पाठवले आणि या पथकाने रिसॉर्ट पिंजून काढले. या वेळी तिथे ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार सुरू अल्याचे आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी ६४ जणांना अटक केली. अटक केलेले बहुतांश व्यापारी हे गुजराती व्यावसायिक असून ते गुजरात आणि मुंबईतून आले होते. त्यांच्याकडून आठ लाखांची रोख रक्कम, ४८ मोबाइल, दहा वाहने, जुगाराचे साहित्य आदी दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अ‍ॅक्ट कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कृष्ण जन्मोत्सवाच्या काळात जुगार खेळण्याची प्रथा आहे. त्यामुळे हे सारे व्यावसायिक जुगार खेळण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. जुगारासाठी जागा देणाऱ्या हॉटेलच्या व्यवस्थापक आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करून हा जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी दिली.