गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जाते. त्यांच्या या जादुई स्वरांचे नेमके रहस्य काय? त्या कशा प्रकारे रियाज करतात, अशा प्रकारचे कुतूहल संगीत प्रेमींच्या मनी कायम असते. याचा उलगडा करण्याची अनोखी संधी ठाणेकरांना ९ जानेवारीला मिळणार आहे.

विश्वशांती संगीत नृत्य समारोहाच्या माध्यमातून किशोरीताई आमोणकर नवीन कलावंतासोबत संवाद साधणार आहेत. गडकरी रंगायतन येथे सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संगीतातून शांतीचा संदेश देण्यासाठी आणि संगीत कला नृत्य यांची ओळख नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती नृत्यधारा संस्थेच्या संस्थापिका मुक्ता जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

किशोताईंचा अभ्यास व साधना हा नेहमीच रसिकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला आहे. संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, गुरूचे  महत्त्व, शास्त्रीय संगीत हे भावसंगीत आहे हा त्यांचा दृष्टिकोन त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणार आहेत. तसेच मैफलीमध्ये रागनाटय़ अशा विविध विषयांवर त्या संवाद साधाणार आहेत. हा कार्यक्रम केवळ मैफल नसून प्रतिभावंत कलावंताचा रसिक व संगीत अभ्यासकांशी एक  प्रकारचा मुक्तसंवाद असेल, असा विश्वास मुक्ता जोशी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अनाहत नाद, शांतीरूपक नृत्य, शिवोत्परह तांडव, स्वरानुभूती नृत्य सादर होणार आहेत. यावेळी पंडित सुरेश बापट व कल्याणी साळुंखे यांच्या गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.  किशोर पांडे तबल्यावर, सारंगीवर फारुख लतिफ खान, हार्मोनियमवर अभिजित करंजकर साथ देणार आहेत.