भाद्रपद मासात तुम्हा-आम्हा सर्वाच्या लाडक्या गणरायाचं आगमन होत असलं तरी त्याच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने आधीपासूनच वाट पाहत असतात. घरगुती गणपती असो की सार्वजनिक, सर्वजण एकजुटीने त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. त्यामुळे घरीदारी आनंदाचं, उत्साहाचं, प्रेमाचं वातावरण आपोआप तयार होतं आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येतात, गाठीभेटी होतात, ऋणानुबंध निर्माण होतात. परिणामी सर्वत्र सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. आपल्या सण-उत्सवांचे हे वैशिष्टय़ आहे की त्या निमित्ताने मने जुळावीत, नाती दृढ व्हावीत आणि भेदभाव गळून पडावेत. अशी व्यापक विचारधारा घेऊन येणारे
ठाण्यातील काही शाळा सण-उत्सवांमागील हा व्यापक विचार लक्षात घेऊन जाणीवपूर्वक शालेय गणेशोत्सवाचा उपक्रम राबवत आहेत आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठाण्यातील ए. के. जोशी- इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पूर्वप्राथमिक विभागात गणपती आणला जातो. विशेषत्वाने उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे महिना-दीड महिना आधी लहान शिशू, मोठा शिशू वर्गातील मुलांना इको फ्रेंडली गणपती आणि गणेशोत्सव या विषयीची माहिती संवादातून अगदी सोप्या भाषेत त्यांचे वय लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सांगितली जाते. गणेशपूजन (भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे) हे निसर्गाशी नाते सांगणारे असेच आहे. या मुलांना शाडूची मातीची मूर्ती, त्याचे महत्त्व, गणपतीची सजावट, पूजेची तयारी, पत्री, नैवेद्य इ.विषयीची माहिती सचित्र सांगितली जाते. लहान शिशूकडून क्लेपासून मोदक तयार करणे आणि मोठय़ा शिशूकडून गणपतीबाप्पाची छोटीशी मूर्ती करून घेण्याचा सराव करून घेतला जातो. सराव झाल्यावर मात्र शाडू मातीपासून मुले मोदक आणि गणपती तयार करून घरी घेऊन जातात.
शाळेमध्ये शाडूची गणेशमूर्ती आणली जाते. त्याच्या स्वागतासाठी पूर्व-प्राथमिक विभागातील व्हरांडय़ामध्ये, वर्गामध्ये गणेशमूर्तीच्या सुंदर प्रतिमा, मोदक, जास्वदींची फुले, रंगवलेल्या पताका चटकन लक्ष वेधून घेतात. दोन्ही बाजूच्या भिंतीवर गणेशाची विविध रूपे असलेली मोठी छायाचित्रे लावून केलेली सजावट आकर्षक तर आहेच, पण मुलांना खूप काही शिकवून जाणारी, कायमस्वरूपी ठसा उमटवून जाणारी आहे. सर्व मुले पारंपरिक पेहराव करून येतात आणि मग वाजत-गाजत गणपतीबाप्पाची गाणी म्हणत गणपती पूर्वप्राथमिक विभागात स्थानापन्न होतो. शिक्षिका गणपतीची पूजा करतात तेव्हा दुसरी शिक्षिका त्यांना सर्व समजावून सांगत असते. पूजेला काय लागते? गणपतीला कोणते फूल आवडते? त्याचा रंग कोणता असतो? नैवेद्य काय करतात? मोदक कशांचा करतात? इ. प्रकारे माहितीची देवाणघेवाण संवादातून होत होती आणि मुले ते प्रत्यक्ष अनुभवतही होती. त्यानंतर मग आरती झाल्यावर मुलांनी सामूहिक श्लोक म्हटले आणि मग सर्वाना प्रसाद वाटण्यात आला.
दुसऱ्या दिवशी मुले शाळेत आल्यावर गणपतीची पूजा करून, आरती म्हणून नंतर गणेशमूर्तीचे विसर्जन बादलीमधील पाण्यातच केले जाते. शाळा सुटताना मुलांना, पाण्यामध्ये विसर्जित झालेली शाडूमातीची मूर्ती प्रत्यक्ष अनुभवता येते. काळाची निकड लक्षात घेता अशा तऱ्हेच्या प्रत्यक्ष अनुभवांमधून, संवादाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्याचे संस्कार परिणामकारकरीत्या होणार आहेत. लहान वयात केलेले संस्कार मुलांवरती कायमस्वरूपी ठसा उमटवतात आणि त्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यामुळे अशा तऱ्हेचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळातर्फे डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या वास्तूमधील विद्यालंकार सभागृहात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. १९३५ पासून ही परंपरा गेल्या ६ दशकाहून अधिक काळ जोपासली जात आहे हे आवर्जून नमूद करण्याजोगे आहे. या उत्सवांमध्ये विद्यार्थ्यांना आवर्जून सामावून घेतले जाते. शाळेतील गणेशोत्सवाचे यजमानपद बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागाकडे असले तरी शाळेचा माध्यमिक विभाग आणि इंग्रजी माध्यमाची शाळा या सर्वाच्या परस्पर सहकार्यातून हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी गणपतीच्या सजावटीची जबाबदारी मराठी आणि इंग्रजी शाळेकडे आलटूनपालटून दिली जाते. कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता पर्यावरणपूरक सजावट करण्यास प्राधान्य दिले जाते आणि त्यातही विद्यार्थी सहभागी होतात.
गणेशचतुर्थीच्या दिवशी ढोलताशे आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांची मिरवणूक निघते आणि पारंपरिक पद्धतीने गणेशाचे आगमन होते. त्यानंतर मग शाळेच्या मैदानात विद्यार्थी लेझीम सादर करतात. गणपतीबाप्पा आल्याचा प्रचंड आनंद, उत्साह, बाप्पाविषयीचा नितांत आदर, श्रद्धा हे सगळे तेव्हा उपस्थितांना अनुभवता येते. खरं तर तो एक सुंदर आणि संस्मरणीय अनुभव असतो. शाळेतील निवडलेल्या विद्यार्थ्यांतर्फे गणपतीची यथासांग पूजा केली जाते, आरत्या म्हटल्या जातात.
सकाळ, संध्याकाळ आरती, प्रसाद अशी व्यवस्था केली जाते. सर्व विभागांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या उत्सवाची तयारी करतात आणि एकदिलाने, एकजुटीने उत्साहाने उत्सव साजरा करतात. या निमित्ताने अथर्वशीर्षांची आवर्तनं केली जातात आणि त्यात १००-१५० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. उत्सव साजरा करताना आजुबाजूच्या रहिवाशांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. सण-उत्सवांच्या निमित्ताने आप्तस्वकीय आवर्जून एकत्र येतात, भेटीगाठी होतात, सुखदु:खाच्या भावनांना वाट मिळते, नाती दृढ
होतात. परिणामी कुटुंबात आणि समाजात एकोपा वाढीस लागण्यास मदत होते.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!