कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लाचखोर प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांना महापालिका सेवेत घेण्याचा निर्णय आयुक्त ई. रवींद्रन यांनी घेतल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी बेकायदा बांधकामप्रकरणी निलंबित असलेल्या प्रभाग अधिकारी रेखा शिर्के यांना सेवेत घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.
कल्याणमधील एका व्यापाऱ्याने दुकानात दुरुस्ती केली होती. ही दुरुस्ती बेकायदा आहे म्हणून बोराडे यांनी विमल शंकलेशा व्यापाऱ्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. ठरलेल्या लाचेतील दोन लाख रुपये कय्यूम शेख या आपल्या हस्तकाकरवी बोराडे यांनी स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोराडेला या प्रकरणात अटक केली होती. पालिका प्रशासनाने त्याला निलंबित केले होते. दुर्गाडी किल्ला ते पत्रीपुला दरम्यानचे व्यापाऱ्यांचे गाळे विकसित करून देण्यात हातभार लावणे, बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे याप्रकरणी वेळोवेळी बोराडे यांच्यावर सर्व पक्षीय नगरसेवकांनी टीका केली होती. तत्कालीन आयुक्तांच्या मर्जीने साहाय्यक आयुक्तपदी बढती मिळवण्यात बोराडे यांनी बाजी मारली होती. त्यांच्याकडे महिला बालकल्याण, झोपडपट्टी सुधार, भंडार विभाग देण्यात आले आहेत.

आढावा समितीत निर्णय
निलंबन आढावा समितीच्या बैठकीत बोराडे यांना सेवेत घेण्याचा निर्णय झाला. त्यांच्यावरील आरोपपत्र, दोषारोप कायम ठेवून व न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून बोराडे यांना सेवेत घेण्यात आले आहे. लाचप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला एक वर्षांत निलंबन संपवून सेवेत घेता येते. या अध्यादेशाप्रमाणे त्यांना सेवेत घेण्यात आले आहे.
– दीपक पाटील , उपायुक्त, कडोंमपा