|| सायली रावराणे

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटातच या सर्व गाडय़ा ‘हाऊसफुल्ल’ झाल्या आहेत. कोकण रेल्वेच्या सुमारे ५० गाडय़ा मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ला टर्मिनस या स्थानकांवरून कोकणामध्ये दाखल होतात. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी मे महिन्यातच या गाडय़ांमध्ये तिकिटांचे आरक्षण केले आहे. यंदा गणेश चतुर्थी १३ सप्टेंबर रोजी आहे. साधारणपणे ७ सप्टेंबरपासून कोकणात जाणाऱ्या सर्व प्रमुख गाडय़ांचे आरक्षण पूर्ण होऊन प्रतीक्षा यादीचा आकडाही काही शेकडय़ांच्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, पाच दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन होताच १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीतील परतीच्या गाडय़ांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात येणाऱ्या गणेशोत्सव विशेष गाडय़ांकडे चाकरमानी लक्ष ठेवून आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांचे आरक्षण खुले होताच फुल होते असा अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्फत विशेष गाडय़ा सोडण्यात येतात. मात्र, गर्दीच्या काळात यापैकी बहुतांश विशेष गाडय़ा सायडिंगला जाण्याचे प्रमाण नियमित गाडय़ांपेक्षा अधिक असते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा कल नियमित गाडय़ांचे तिकीट आरक्षित करण्याकडे अधिक असतो. कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा आरक्षित करण्यासाठी चार महिने आधी सुविधा सुरू केली जाते. पूर्ण भारतातून या गाडय़ांचे आरक्षण केले जात असल्याने नियमित गाडय़ांचे गणेशोत्सवाच्या काळातील सर्व जागांचे आरक्षण खुले होताच पूर्ण झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी अजूनही नियमित गाडय़ांमधील तिकिटांचे आरक्षण सुरू असून जवळपास प्रत्येक गाडीची नियमित डब्यांमधील प्रतीक्षा यादी शेकडोंच्या घरात पोहोचली आहे. यापैकी कोकणकन्या, जनशताब्दी आणि मांडवी अशा महत्त्वाच्या गाडय़ांमधील नियमित डब्यांची प्रतीक्षा यादीही बंद करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या पाच दिवस आधीपासूनच्या गाडय़ांमधील जागांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता प्रवाशांना जादा गाडय़ांची वाट पाहावी लागणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडय़ांचे कोणतेही वेळापत्रक अजून जाहीर झालेले नसल्याने प्रशासनाकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष गाडय़ांचा आकडा अजूनही गुलदस्त्याच आहे.

विशेष गाडय़ांची प्रतीक्षा..

मध्य रेल्वेकडून परिपत्रक मिळताच विशेष गाडय़ांचे नियोजन केले जाणार असल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळाता रेल्वेच्या कोकण पट्टय़ात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता विशेष गाडय़ांचा आकडा हा नियमित गाडय़ांपेक्षा अधिक ठेवला जातो. विशेष गाडय़ांची संख्या १५० च्या घरात असण्याची शक्यता कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी वर्तवली असली तरी मध्य रेल्वेकडून सूचना मिळताच या गाडय़ांचा आकडा घोषित करण्यात येणार आहे.

परतीचा प्रवासही

गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वसाधारण डब्यांमधील जागा वेगाने आरक्षित होत असताना वातानुकूलित संवर्गातील वेगवेगळ्या डब्यांमधील जागांचेही आरक्षण प्रतीक्षा यादीपर्यंत पोहोचले आहे. या मार्गावर धावणाऱ्या काही गाडय़ांमधील पहिल्या दर्जाचे महागडे तिकीटही मिळेनासे झाले आहे. या वर्गातही बहुतांश गाडय़ांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडय़ांची प्रतीक्षा यादी तूर्तास खुली असली तरी कोणत्याही क्षणी ही यादीही बंद होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. पाच दिवसांच्या गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर पुढील सलग चार ते पाच दिवसांचे परतीचे आरक्षणही प्रतीक्षा यादीपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती कोकण रेल्वेमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.