X

गणरायाच्या चरणी महागाईची फुले!

१० रुपयांच्या झेंडूची किरकोळीत २०० रुपयांना विक्री

|| भाग्यश्री प्रधान

घाऊकच्या तुलनेत किरकोळ बाजारात सर्रास लूट; १० रुपयांच्या झेंडूची किरकोळीत २०० रुपयांना विक्री

व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावण महिन्यात नीचांक गाठलेल्या फुलांचे दर गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा वधारू लागले असून झेंडू, तगर, शेवंती, मोगरा, गुलाब, जास्वंद अशा सर्वच फुलांचे दर गेल्या महिनाभराच्या तुलनेत किलोमागे दुपटीने वाढले आहेत. घाऊक बाजारात फुलांचे दर वाढत असताना किरकोळीत तर या दरांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मागील आठवडय़ात १० रुपये किलो या दराने विकला जाणारा झेंडू ठाण्याच्या किरकोळ बाजारात रविवारी चक्क २०० रुपयांनी मिळत होता.

गणेशोत्सवात फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. १५ ते २० दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात फुलांची मोठी आवक सुरू  झाल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊ लागला होता. त्यामुळे कधी नव्हे इतके दर घसरले होते. फुले खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यांनी ती फेकून दिल्याचे प्रकारही घडले होते. गेल्या दोन दिवसांपासून मात्र चित्र बदलले असून फुलांची दरवाढ होऊ लागली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही किमती कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत दिवसाला ५६ ट्रक भरून फुलांची आवक होत असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली. गणेसोत्सवामुळे ग्राहकांकडून फुलांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या दीड आठवडय़ापूर्वी घाऊक बाजारात ५ रुपये किलोने मिळणारा गोंडा सध्या ३० रुपये किलोने विकला जात आहे. तर घाऊक बाजारात ३० रुपये किलो या दराने मिळत असलेली शेवंती सध्या १२० रुपये किलोने विकली जात आहे.

विशेष म्हणजे, घाऊक बाजारातील स्वस्ताईचा कोणताही फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचू न देणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारातील दरवाढ मात्र तब्बल दहापट दराने ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवडय़ापर्यंत १० रुपये किलोने मिळणारा पिवळा झेंडू २०० रुपये किलोने विकला जात आहे. तर ६० रुपये किलोने विकली जाणारी शेवंती सध्या २५० रुपये किलोने विकली जात आहे. तर ३० रुपयांना विकला जाणारा गुलाबाच्या १२ फुलांचा एक गुच्छ आता १०० रुपयांना विकला जात आहे. तर गेल्या आठवडय़ात एक रुपयाला विकले जाणारे जास्वंदीचे एक फूल सध्या दहा रुपयाला एक याप्रमाणे किरकोळीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

‘गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त’

फुलांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत, असा दावा कल्याण कृषी बाजार समितीचे यशवंत पाटील यांनी केला. गेल्यावर्षी गणेशोत्सवात घाऊक बाजारातच गोंडा ४५ रुपये किलोने विकला जात होता. तर २०० रुपये किलोने विकली जाणारी शेवंती यावर्षी १२० रुपयांना विकली जात आहे.  त्यामुळे फुलाच्या दरात १५ ते २० रुपयाची तफावत असल्याचे जुन्नरचे शेतकरी गणेश हांडे यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात फुलांचे भाव नेहमीच वधारतात. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव कमीच आहेत. मुळात यावर्षी फुलांचे उत्पादन भरपूर असल्याने फुलांच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. तगर, जास्वंद, गुलछडी, झेंडू, गुलाब, मोगरा या फुलांना मागणी आहे.   – शामकांत चौधरी, कल्याण कृषी समिती