सार्वजनिक गणेशोत्सवातील अनेक गणेश मंडळांच्या सजावटींमध्ये समाजात घडणाऱ्या तत्कालीन घटनांचे प्रतिबिंब दिसून येत असते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. अलीकडेच प्रदर्शित होऊन अल्पावधीतच लोकप्रियतेचा विक्रम करणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपटाचा प्रभाव यंदाच्या गणेशमूर्तीमध्ये दिसून येत आहे. ‘बाहुबली’च्या रूपातील गणेशमूर्ती बाजारात आल्या असून त्यांना भाविकांची पसंती मिळत आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात नायकाने खांद्यावर शिवपिंड उचलल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. या प्रसंगाची प्रतिकृती म्हणून शिवपिंड खांद्यावर पेललेल्या गणेशमूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत. ‘बाहुबली’ चित्रपटातील या प्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर चित्रपट प्रदर्शनाआधीच झळकली होती. त्याने हा चित्रपट लोकप्रिय होणार असा अंदाज बांधून मूर्तिकारांनी त्याच्या रूपातील गणेशमूर्ती साकारल्या. त्यांचा हा होरा खरा ठरला असून चित्रपटापाठोपाठ ‘बाहुबली’ गणेशही उत्सवात लोकप्रिय ठरणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. गणेशमूर्ती विशिष्ट साचात तयार केल्या जातात, पण इतक्या कमी वेळेत ‘बाहुबली’चा साचा तयार करणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘बाहुबली’ गणेशाच्या मूर्ती मूíतकारांना       स्वत:च्या हातांनी घडविल्या आहेत. कल्याणमध्ये समीर एलेकर यांनी आपल्या अनुराग कला मंदिर येथे बाहुबली गणेशाची मोठी मूर्ती तयार केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाहुबली गणेशाच्या मूर्तीना मागणी आहे, असे अनुराग कला मंदिरचे कारागीर श्याम पारधी यांनी सांगितले.