कोंडी, अपघात, आजारांनी रहिवासी त्रस्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन भिवंडी-निजामपूर महापालिकेने दिले होते, मात्र आता विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला तरी खड्डे कायम आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये खड्डय़ामुळे होणारी वाहतूक कोंडी, वाढलेले अपघात, रत्यांवरील खड्डय़ांची झालेली तळी आणि त्यामुळे होणारे आजार यांमुळे भिवंडीकर हैराण झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांत रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेकांचे बळी गेल्यानंतरही खड्डे बुजवण्याचे शहाणपण भिवंडी महापालिकेला सुचलेले नाही. निदान गणेशोत्सवात तरी रस्त्यांवरील खड्डय़ांचे विघ्न टळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.

खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून बरीच टीका झाल्यावर पालिकेने मातीचा भराव टाकून खड्डे बुजवण्यास केली. मात्र पालिका प्रशासनाचा हा उपाय इलाजापेक्षाही भयंकर ठरला. कारण तुरळक पावसाने या ठिकाणी चिखलावरून घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे भिवंडीच्या रस्त्यांवरून     वाहने चालवताना चालकांना अजूनही कसरत करावी लागत आहे. भिवंडीतील बहुतेक सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील विर्सजन घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अक्षरश: दुरवस्था असल्याने गणेशभक्तांना विसर्जस्थळ गाठण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

‘न्यायालयात दाद मागणार’

भिवंडीतील शिक्षक ज्ञानेश्वर गोसावी यांनी रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या भिवंडीकरांची व्यथा मांडणारे पत्र तब्बल ९० नगरसेवक आणि दोन आमदारांना पाठविले आहे. त्यापैकी तीन नगरसेवकांनी हे पत्र स्वीकारलेच नाही. तसेच यापैकी एकाही लोकप्रतिनिधींनी उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे त्रस्त भिवंडीकर आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

गणेशोत्सवाआधीपासूनच भिवंडी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. बहुतेक खड्डे बुजविण्यात आले आहेत. काही रस्ते महामार्ग प्राधिकरण आणि एमएमआरडीएकडे असल्याने त्यांची दुरुस्ती करताना परवानगी घ्यावी लागते. या दोन्ही प्राधिकरणांशी भिवंडी निजामपुरा महानगरपालिकेच्या माध्यामातून वारंवार पत्र व्यवहार केला जातो. मात्र या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांचा रोष पालिकेला सहन करावा लागतो.

– जावेद दळवी, महापौर भिवंडी-निजामपुरा महानगरपालिका

विसर्जन घाटांचीही वाट बिकट

* मूळ भिवंडी गावातील गणपती शिवाजी चौक, वंजार पट्टी नाका, एस.टी. स्टॅण्ड मार्गे मिरवणुका वंजार पट्टी नाका येथे एकत्र येतात. भादवड तलाव येथे भाडवड, टेमघर, कल्याण रोड या भागातील गणपतींचे विसर्जन केले जाते.

* धामणकर नाका कॉलेज रोड मार्गे पद्मनगर, कणेरीहून येऊन वराला देवी विसर्जन घाटत विसर्जन केले जाते. कामतघर घाट येथे कामतघर गाव, रेल्वे लाइन परिसर येथील गणपती, फेणे घाट येथे फेणे गाव, नारपोली तलाव येथे नारपोली, साठेनगर, देवजीनगर परिसरातील गणपती विसर्जित केले जातात.

* पोगाव गावातील गणपती पोगाव तलाव येथे, चाविन्द्र गावातील गणपती चाविन्द्र घाट येथे विसर्जित केले जातात. या सर्व मार्गावर खड्डे पडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival was overbut bhiwandi potholes continued
First published on: 21-09-2018 at 02:56 IST