मीरा-भाईंदर पालिकेच्या मोहिमेचा फज्जा; केवळ ११ जणांकडून प्रतिसाद

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने पुण्याच्या धर्तीवर ‘घरच्या घरी विसर्जन’ हा प्रयोग राबवला होता. या प्रयोगामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल आणि विसर्जनानंतरच्या गाळाचा उपयोग खत म्हणूनही करता येऊ शकेल, अशी ती मोहीम होती. मात्र नियोजनाअभावी आणि जनजागृती करण्यात अपयश आल्याने महापालिकेचा हा प्रयोग फसला आहे. गेल्या सात दिवसांत मीरा-भाईंदरमध्ये साडे सोळा हजार गणेशमूर्तीचे विसर्जन झाले, मात्र केवळ ११ जणांनीच हा प्रयोग राबवल्याचे चित्र आहे.

गणेशमूर्तीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात कॅल्शियम सल्फेट हे पाण्यात सहजासहजी विरघळत नाही. गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर वर्षांनुवर्षे त्या पाण्यात तशाच राहतात. यात पर्यावरणाला धोका निर्माण होतोच, शिवाय मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक रंगांमुळे जलसृष्टीलाही मोठी हानी पोहोचते. यामुळेच मीरा-भाईंदर महापालिकेने अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बेकरीत वापरण्यात येणाऱ्या खाण्याच्या सोडय़ात अर्थात अमोनियम बाय काबरेनेटमध्ये शास्त्रीय पद्धतीने विघटन करणे सहज शक्य असल्याचे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधकांनी शोधून काढले आहे. याचाच उपयोग करून गणेशमूर्तीच्या विसर्जनाची पद्धत विकसित करण्यात आली होती. महापालिकेने मूर्ती विसर्जनासाठी लागणारी हे पावडर नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र केवळ ११ जणांनीच ही पावडर नेल्याची नोंद महापालिकेकडे आले.

आतापर्यंत दीड, पाच, गौरी गणपती तसेच सात दिवसांच्या मिळून १६ हजार ६५३ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. यात सावर्जनिक गणेशमूर्तीची संख्या केवळ ७२७ असून उर्वरित घरगुती गणपतींचा समावेश आहे. त्यापैकीच केवळ ११ जणांनीच ‘घरच्या घरी विसर्जन’ हा प्रयोग राबवल्याने हे महापालिकेचे अपयश असल्याचे बोलले जाते.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ही योजना राबविण्यात आल्याने तसेच योग्य पद्धतीने त्याची प्रसिद्धी न केल्याने ही माहिती भक्तांपर्यंत पोहोचली नाही. परिणामी बहुतांश गणेश मूर्तीचे शहरातील १७ नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आवश्यक असलेली अमोनियम बाय काबरेनेट ही पावडर महापालिकेने प्रभाग कार्यालयात मोफत उपलब्ध करून दिली असली तरी बहुतेकांना त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. केवळ नियोजनाअभावी यंदा पर्यावरणपूरक विसर्जनाचा हा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • भाईंदर पश्चिम येथील प्रभाक कार्यालय दोनमधून आठ जणांनी विसर्जनासाठी लागणली अमोनियम बाय काबरेनेट ही पावडर नेली.
  • प्रभाग क्रमांक तीन व सहामधून पावडरचे एकही पाकीट नेण्यात आलेले नाही.
  • प्रभाग पाच व तीनमधून अनुक्रमे दोन व एक जणाने ही पावडर नेली.
  • प्रभाग एकमधून प्रशासनाने स्वत:च ११० किलो पावडर भक्तांना नेऊन दिली, परंतु भक्तांनी त्याचा विसर्जनासाठी उपयोग केला की नाही याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही.