News Flash

आता घरीच ‘श्रीं’चे विसर्जन

पर्यावरण संवर्धनासोबत मिरवणुकांचा त्रास वाचविण्यासाठी भाविकांचा पर्याय

पर्यावरण संवर्धनासोबत मिरवणुकांचा त्रास वाचविण्यासाठी भाविकांचा पर्याय

रस्त्यांवरील खड्डे, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, कर्णकर्कश ध्वनिक्षेपकाच्या तालावर मिरवणुकांमध्ये घातला जाणारा गोंधळ यामुळे हल्ली अनेक जण घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करू लागले आहेत. त्याचप्रमाणे प्लास्टर अथवा मातीची मूर्ती न वापरता घरगुती उत्सवात कायमस्वरूपी धातूच्या मूर्तीची पूजाही अनेक जण करू लागले आहेत.

गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे नदी-नाल्यांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गेली काही वर्षे कृत्रिम तलावाची संकल्पना ठाण्यात वापरली गेली. तोच पर्याय सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अवलंबला जात आहे. गणपतीच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या हारफुलांचे निर्माल्यही वेगळ्या कलशात संकलित करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा पर्यावरणस्नेही मार्ग ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या संस्थेने महापालिकेच्या सहकार्याने दाखवून दिला. मात्र आता त्याच्याही पुढे एक पाऊल जात घरच्या घरी विसर्जन करून मिरवणुकीतील संभाव्य कटकटी टाळण्याचा समंजसपणा भाविक दाखवू लागले आहेत.

हल्ली कृत्रिम तलावात विसर्जन केले जात असले तरी त्याने मिरवणुकांचा त्रास काही कमी झालेला नाही. मिरवणुकीत मूठभर हौशे-नवशे-गौशे गोंधळ घालत असतात. मात्र त्याचा नाहक त्रास इतरांना भोगावा लागतो. विशेषत: घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांचे त्यामुळे हाल होतात. त्यांना इच्छा नसताना अंगावर गुलाल उडवून घ्यावा लागतो आणि डीजेंचा दणदणाट सहन करावा लागतो. पुन्हा कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्तीचीही नंतर नीट विल्हेवाट लावली जात नसल्याचे आक्षेप घेतले जातात. अनेकदा मूर्तीच्या संख्येच्या तुलनेत कृत्रिम तलाव अपुरे पडतात. त्यामुळे नीट विसर्जन होत नाही. त्यामुळे शाडूच्या मंगलमूर्तीचे घरातच विसर्जन करण्याचा पर्याय आता भाविक स्वीकारू लागले आहेत.

विसर्जन मिरवणुकांमधील त्रास वाचविण्यासाठी भाविकांनी घरच्या घरी ‘श्री’ंचे विसर्जन करणे हा अतिशय उत्तम पर्याय आहे. विसर्जित केली जाणारी मूर्ती शाडूच्या मातीचीच आणि जास्तीत जास्त सहा इंची असावी, असा नियम करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकेल.

-दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते 

 

गेली काही वर्षे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाविषयी जनजागृती सुरू आहे. त्यातच विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुका, त्यातील गोंधळही त्रासदायक ठरतो. तो टाळण्यासाठी घरातच मूर्तीचे विसर्जन करण्याची कल्पना माझ्या मुलीने- मैत्रयीने मांडली. त्यांच्या शाळेत त्याविषयी चर्चा झाली होती. आम्हालाही तो उपाय आवडला. तेव्हापासून आम्ही कायमस्वरूपी चांदीची गणेशमूर्ती पूजेसाठी वापरतो आणि घरच्या घरीच विसर्जित करतो.

-मीरा भारती, ठाणे

 

आमच्या घरात संपूर्णपणे शाडूच्या मातीने बनविलेल्या वृक्षगणेशाची स्थापना केली आहे. त्या गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात घरच्या घरी लागवड करता येण्याजोग्या झाडांच्या बिया आहेत. घरच्या घरीच या मूर्तीचे विसर्जन होईल. पाण्यामुळे मूर्तीचे आवरण निघून जाईल आणि आतील बिया रुजून त्यापासून रोपे तयार होतील.

-सुनील महाजन, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 12:46 am

Web Title: ganesh idol immersion at home 3
Next Stories
1 वाहतूक कोंडीवर तोडगा
2 वाहनांचे बनावट बिल्ले विकणाऱ्यांना अटक
3 वसईच्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याची हत्याच