सात दिवसांच्या १९ हजार गणेशमूर्तीचे तर १८९८ गौरींचे विसर्जन; पालिकेच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद; चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित घटना नाही

ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये पाच दिवसांच्या १९ हजार ३६६ गणेशमूर्तीचे तर १९८८ गौरीचे विसर्जन करण्यात आले. तसेच स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या ३९३ गणेशमूर्ती व ३ गौरींचे महापालिकेने विधिवत विसर्जन केले. या विसर्जनाकरिता ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत शहरात ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या.

ठाणे शहरातील तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून महापालिकेने यंदाही शहरात गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची संकल्पना राबविली आहे. रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन येथे कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था होती. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम तलावांना विसर्जनासाठी भरभरून प्रतिसाद मिळू लागला असून यंदा दीड दिवसांपाठोपाठ पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्याचबरोबर गौरीचेही विसर्जन झाले. गणेश विसर्जनदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच महापालिकेनेही यंत्रणा सज्ज केली होती. त्यामध्ये अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे पाचशे स्वयंसेवक, दीडशे महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान यांचा समावेश होता.

विसर्जनाची आकडेवारी..

मासुंदा तलावामध्ये ४ हजार ६१८ गणेशमूर्ती व २०६ गौरींचे , रायलादेवी येथील दोन कृत्रिम तलावांमध्ये ३ हजार ७७९ गणेशमूर्तीचे व ४३९ गौरींचे, उपवन येथील दोन कृत्रिम तलावांमध्ये १ हजार ७१४ गणेशमूर्तीचे व ७१ गौरींचे, आंबेघोसाळे येथील कृत्रिम तलावामध्ये ६११ गणेशमूर्तीचे व ७८ गौरीचे, पारसिकनगर येथे  विसर्जन महाघाटवर १ हजार ३०८ गणेशमूर्तीचे व १७९ गौरींचे तर कोलशेत घाटासह इतर आठ विसर्जन घाटांवर एकूण ३ हजार १९३ गणेशमूर्तीचे व ५१४ गौरींचे विसर्जन झाले. कळव्यातील विविध विसर्जन घाटावर १ हजार ८०२ गणेशमूर्तीचे व ११८ गौरींचे , मुंब्य्रातील विविध विसर्जन घाटावर १ हजार १४४ गणेशमूर्तीचे व १०७ गौरींचे कोपरीत ८१८ गणेशमूर्तीचे व १८३ गौरींचे विसर्जन करण्यात आले.