तलावांमध्ये पाण्याची कमतरता; मूर्तीच्या तुलनेत तलाव अपुरे

गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांची आणि मंडळांची संख्या दर वर्षी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. परंतु त्याचप्रमाणात विसर्जन स्थळांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे असताना त्यात मात्र घट होताना दिसत आहे. तर तलावाच्या पाण्याची पातळीही कमी झाल्याची विदारक परिस्थिती अंबरनाथ, बदलापूर परिसरात निर्माण झाली आहे. त्यामुळे असलेल्या तलावांच्या किनाऱ्यावर गर्दी आणि पाण्याची पातळी कमी असलेल्या तलावांच्या किनारी मूर्तीचे ढीग पाहायला मिळत आहेत.

अंबरनाथ, बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेत वाढ होत आहे. मात्र त्याच वेळी गणेशविसर्जनाच्या स्थळांमध्येही विशेष वाढ झालेली नाही. अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा मोठा असला तरी गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्जन होत असलेल्या नैसर्गिक नाले आणि प्रवाहांत पाणीस्तर कमी झाला आहे.

त्यामुळे दीड, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनात विसर्जित झालेल्या मूर्ती काही तासांत वर आल्याचे दिसून आले. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे आधीच्या मूर्तीचे विघटन होण्याआधीच विसर्जनासाठी नव्याने मूर्ती दाखल झाल्याने जलस्रोतांच्या किनारी पडलेला अवशेषांचा ढीग साफ करताना स्थानिक प्रशासकीय यंत्रणांची दमछाक होत आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरातील विसर्जनस्थळी मूर्तीचा अक्षरश: खच पाहायला मिळतो आहे. ज्या प्रमाणात नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन करण्यात येते तितकीच पसंती कृत्रिम तलावांना देताना गणेशभक्त दिसत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवर विसर्जनाचा मोठा ताण येतो आहे. अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिर परिसरात कुंड आणि मंदिराशेजारून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात मोठय़ा प्रमाणावर विसर्जन होते. अडवलेल्या पाण्याची पातळी कमी असल्याने येथे गणेशमूर्तीचे विसर्जन करतानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विसर्जन स्थळांची कमी होत जाणारी संख्या आणि तुलनेने वाढणाऱ्या मूर्तीचे गणित जमविताना प्रशासकीय यंत्रणांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत. दरम्यान, गणेश मंडळे आणि घरगुती गणेश भक्तांनी शाडूच्या, कमी उंचीच्या मूर्ती आणि घरोघरी विसर्जनावर भर देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.

कृत्रिम तलावातही मूर्ती विखुरलेल्या

महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. मात्र त्यातही पाणी पातळी कमी असल्याने विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी येथेही मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे विसर्जन झाल्यानंतर काही काळानंतर मूर्ती बाजूला काढण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. या तलावांमध्ये नव्याने विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांमध्ये परिस्थिती पाहून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.