आवाजाची मर्यादा पाळण्याचे पोलिसांचे आवाहन

गणेश विसर्जनात डीजेवर उच्च न्यायालयाने बंदी घातली असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना दिल्या आहेत.

मिरवणुकांसाठी लाऊडस्पीकरला १२ वाजेपर्यंत परवानगी असली तरी  वेळेच्या मर्यादेचे आणि ध्वनी पातळीच्या नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहनही पोलीसांनी केले आहे. ठाणे ते बदलापूपर्यंत वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय, विसर्जनस्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

ठाणे ते बदलापूपर्यंतच्या पट्टय़ातील  शहरांत रविवारी ७०० सार्वजनिक आणि २७ हजार घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. या शहरांमध्ये नऊ पोलीस उपायुक्त, १७ सहायक पोलीस आयुक्त, ११० पोलीस निरीक्षक, २५७ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ३५ महिला अधिकारी, ३३३२ कर्मचारी, ७०० महिला कर्मचारी असा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. शीघ्रकृती दलाची एक कंपनी, एसआरपीएफच्या पाच कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकडय़ा, ३९१ पुरुष होमगार्ड आणि १०० महिला होमगार्ड असा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय, वाहतूक शाखेचे ५४ अधिकारी आणि ५५० कर्मचारी, २५० वाहतूक सेवक आणि ७३ होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. मंडळांच्या प्रतिनिधींसोबत आतापर्यंत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये नियम, डीजे, आवाजाचे प्रदूषण आणि मर्यादेबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मंडळांना देण्यात आली आहे.

अवजड वाहतुकीला पथकरातून सूट

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विसर्जनस्थळांच्या मार्गावर ३१ क्रेन ठेवण्यात येणार आहेत. अवजड वाहतुकीला दुपारी २ वाजल्यापासून बंदी आहे. याशिवाय, विसर्जनस्थळांवर सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी आहे. २३ सप्टेंबर सायंकाळी ६ ते सोमवार, २४ सप्टेंबर पहाटे ६ वाजेपर्यंत ठाण्याहून जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना आनंदनगर आणि ऐरोली या नाक्यावर पथकरात सूट दिली जाणार आहे. मात्र जेएनपीटीहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहतुकीला या दोन्ही नाक्यांवर पथकरात सूट देण्यात आलेली नाही.

आवाजाची पातळी मोजणार

ठाणे ते बदलापूपर्यंत ३५ पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन ध्वनिमापक यंत्रे आहेत. या यंत्रांद्वारे मिरवणुकांमधील आवाजाच्या पातळीचे मापन करण्यात येणार आहे. त्याच्या तपासणीमध्ये आवाजाच्या पातळीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले तर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली.