मध्यरात्री १२ नंतर सर्व ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक बंद

पालघर जिल्ह्यातील गणपती विसर्जन निर्विघ्नपणे व शांततेमध्ये झाले. आपल्या लाडक्या देवतेला निरोप देताना गणेश मंडळांनी केलेली सजावट तसेच बॅन्जोच्या माध्यमातून संगीतमय साथ देत भक्तिमय वातावरणत विसर्जन झाले. भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. ६०७ सार्वजनिक व सुमारे ४८०० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी पोलिसांनी रात्री १० वाजल्यानंतर खाक्या दाखवत वाद्यवृंद बंद पाडण्याच्या प्रकारामुळे पालघरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर पालघर पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. पालघर शहरामध्ये विसर्जनासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था व मोठय़ा प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सायंकाळी सहाच्या सुमारास विसर्जनाला आरंभ झाला. अनेक गणेश मंडळांनी फुलांनी व आकर्षक रोषणाईने मिरवणुकी दरम्यान सजावट केली होती. बॅन्जोच्या धुंदीवर नाचणाऱ्या भाविकांच्या जोडीला ढोल व लेजीम पथके सहभागी झाली होती. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी पालघर व परिसरातील नागरिक विसर्जन मार्गावर गर्दी करून होते. काही सामाजिक संस्थानी भाविकांसाठी अल्पोपहार, सरबत, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पहाटेपर्यंत विसर्जन

पालघरमधील सर्व गणेश मंडळांनी डी.जे. ऐवजी बॅन्जो पथकांचा विसर्जन मिरवणुकीत समावेश केला होता. मध्यरात्र १२ वाजताच पोलिसांनी या वाद्यवृंदांना इशारा देताच सर्व ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक बंद करून नियमांचे पालन केले; व अचानकपणे कानामध्य ४-५ तास घुमणारा आवाज बंद होऊन शांतता पसरली. पहाटे तीन वाजपर्यंत विसर्जन झाले.