गणेशोत्सवाची आचारसंहिता मंडळांकडून धाब्यावर * पालिका, पोलीस, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
कल्याण डोंबिवली पालिकेने रस्त्यावर मंडप उभारण्याबाबत केलेली नियमावली धुडकावून लावत, गणेशोत्सव मंडळांनी भर रस्ते, चौकांमध्ये गणपतीचे मंडप उभारून वाहतूक कोंडीला आमंत्रण दिले आहे. या मंडळांनी अनेक ठिकाणी पदपथ अडवून ठेवले आहेत. पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. पालिका अधिकाऱ्यांनी नियमबाह्य़ मंडप उभारणाऱ्या गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव मंडळांना रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी देताना पालिका अधिकाऱ्यांनी संबंधित रस्ते, चौकाची पाहणी करणे आवश्यक होते. परंतु, आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कठोर शिस्तीला वचकून अनेक अधिकारी सकाळीच कार्यालयात, सफाई कामगारांवर नजर ठेवण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. अशा थकलेल्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळांना जागेची पाहणी न करताच, परवानग्या दिल्याचे समजते. पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ऋणाणुबंध असल्याने, ते या उत्सवी मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाराज करू शकले नाहीत. त्यामुळे उत्सवी मंडळांनी पालिकेची फक्त परवानगी घेण्याचा उपचार पार पाडला. पोलीस, वाहतूक विभागाच्या परवानग्या मिळवून थेट रस्ता अडवून मंडप उभारणे पसंत केले आहे.
उच्च न्यायालयाने शासनाला फटकारल्यामुळे या वेळी रस्त्यावर मंडप कोठे दिसणार नाहीत. असे नागरिकांना वाटले होते. मात्र भर चौक, रस्त्यांमधील मंडप पाहून नागरिक हैराण आणि आश्चर्यचकित झाले आहेत. मंडळे पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाला जुमानत नाहीत. पण, न्यायालयाच्या आदेशालाही जुमानत नसल्याने नागरिक या विषयी यापुढे तक्रार करायची कोणाला असा प्रश्न करीत आहेत.

कारवाई करणार
गणेशोत्सव मंडळांनी पालिकेच्या नियमावलीप्रमाणे मंडप उभारले नाहीत. त्यांची चित्रफित करण्याचे करण्याचे काम सुरू आहे. अशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नियमावलीप्रमाणे कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. प्रशासनाने पहिले उभारलेले मंडप, त्यांची उभारणीचे काम सुरू केले आहे. ज्यांनी नियम मोडले आहेत. त्यांची चित्रफित केली जात आहे.
– परशुराम कुमावत,
प्रभाग अधिकारी, कडोंमपा