गणेश मंदिर संस्थानचा पुढाकार
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. शाळाही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे येत्या वर्षभरात जिल्हा परिषद तसेच महापालिका शाळांमधील स्वच्छतागृहांची साफसफाई करण्याचा संकल्प गणेश मंदिर संस्थानने जाहीर केला आहे.
श्रीगणेश मंदिर संस्थानच्या वतीने हिंदू नववर्षांचे स्वागत मोठय़ा जल्लोषात करण्यात येते. दरवर्षी संस्थानातर्फे एखादा विधायक उपक्रम राबविला जातो. त्याची घोषणा नववर्ष स्वागत यात्रेत केली जाते. यंदा शाळांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे त्याविषयी काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अच्युतराव कऱ्हाडकर यांनी सांगितले.
नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त काय करायचे याविषयी संयोजन समितीच्या बैठका सुरूहोत्या. यावेळी विविध शाळांचे शिक्षक, संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दैन्यवस्थेचा मुद्दा मांडण्यात आला. शहरात पाणीटंचाईची समस्या बिकट आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी स्वच्छतागृहे घाणीचे साम्राज्य ठरली असून त्यांना दरुगधी सुटली आहे. स्वच्छतागृह साफ करण्यासाठी पाणी नसल्यानेही या स्वच्छतागृहांना दरुगधी सुटली आहे. मुले तशाच अवस्थेत दररोज शाळेत बसतात. त्यामुळे येत्या वर्षांत शाळांमधील स्वच्छतागृहांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला.