नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची गणेश नाईक यांच्याशी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी त्यांच्या समर्थकांचा दबाव वाढू लागला आहे. ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी रविवारी नाईक यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करा, अशी मागणी केल्याने आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीत नाईक यांचे पुत्र आणि आमदार संदीप नाईक अनुपस्थित असले तरी भाजप प्रवेशासाठी ते सुरुवातीपासून आग्रही असल्याची वृत्त आहे.  लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर नवी मुंबईतील नाईक समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.

मध्यंतरी नाईक यांनी बोलविलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत काहींनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस सोडा असे आर्जव नाईक यांच्याकडे केले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही आनंद परांजपे हे ४५ हजार मतांनी मागे होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. नाईक यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहीन अशी भूमिका घेतल्याने काही नगरसेवकांनी भाजप-सेनेत प्रवेशाची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे नाईक यांच्या गोटात अस्वस्थता आहे.

‘एकाही नगरसेवकाचा राजीनामा नाही’

ठाणे जिल्ह्य़ात नाईक यांना मानणारा मोठा वर्ग असून सद्य:स्थितीत भाजपमध्ये असलेल्या ठाणे आणि मीरा भाईदर महापालिकेतील नगरसेवकांनीही नाईक यांची मध्यंतरी भेट घेतल्याचे कळते.  दरम्यान, या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर नाईक यांनी मात्र आपला एकही नगरसेवक राजीनामा देणार नाही, असे माध्यमांपुढे स्पष्ट केले. काही नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा यापूर्वीही व्यक्त केली आहे. मात्र, राजीनाम्याचे वृत्त खोटे आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी सांगितले.