स्वतंत्र पालिकेच्या मुद्दय़ावरून भाजपची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा

गेल्या वर्षी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने ऐरणीवर आलेल्या कल्याण तालुक्यातील २७ गावांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे आता वर्षभरानंतरही कायम असून काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनानिमित्त राजकीय कुरघोडीचा पुढील अंक रंगण्याची चिन्हे आहेत.

[jwplayer OnydZc5l]

संघर्ष समितीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीत आपला प्रभाव वाढविण्यात भाजपला यश आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले २७ गावांसाठी स्वतंत्र पालिका स्थापण्याचे आश्वासन अद्याप युती शासन पूर्ण करू शकलेले नाही. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांना या मुद्दय़ावर काळे झेंडे दाखविण्याचा जाहीर इशारा दिला आहे. राष्ट्रावादीचे कार्यकर्ते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांचीही त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. त्यामुळे संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एकीकडे संघर्ष समिती व साहित्य संमेलन हे दोन्ही मुद्दे वेगळे असल्याची ओरड संघर्ष समितीचे नेते करीत आहेत. साहित्य संमेलनापासून राजकारण दूर ठेवावे अशी ओरड होत असली तरी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे हे संघर्ष समितीचे उपाध्यक्षही आहेत. महानगरपालिका निवडणूकीच्यावेळी भाजपने समितीची कोंडी करुन त्यांच्या पक्षामार्फत उमेदवार उभे करुन आपली पोळी भाजून घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी समितीला दिलेला शब्द ते पाळत नसून यामुळे संघर्ष समितीत मोठी धुसफूस सुरू झाली आहे.  मुख्यमंत्र्यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत यासंदर्भात भूमिका स्पष्ट न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. मुंबई, ठाणे व उल्हासनगर पालिकांच्या निवडणुकीच्या वेळीच हा मुद्दा उफाळून आल्याने भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

२७ गावे महानगरपालिकेतून वगळावी अशी संघर्ष समितीची पहिल्यापासूनची मागणी राहिलेली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नाईक यांनीही मुख्यमंत्र्यांनी समितीला दिलेला शब्द न पाळल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी २७ गावांचा मुद्दय़ावर लक्ष घालावे. जेणेकरुन त्यांचे डोंबिवली शहरात निषेधाचे नाही तर स्वागताचे झेंडे दाखवून स्वागत होईल.

गुलाब वझे, संघर्ष समिती उपाध्यक्ष, संमेलन स्वागताध्यक्ष

२७ गावांची स्वतंत्र नगरपरिषद साहित्य संमेलनापूर्वी घोषित न झाल्यास मुख्यमंत्र्यांना  काळे झेंडे दाखविले जातील असा इशारा नाईक यांनी दिला त्यांच्या या भूमिकेला संघर्ष समितीचा पाठिंबा राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळून चूक केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांच्या निषेधाला सामोरे जावे. जानेवारी महिन्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय जाहीर केला नाही तर गावांच्या समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल.

-चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, संघर्ष समिती

[jwplayer 1yLms27W]