ठाणे पोलिसांचा गणेशोत्सव मंडळांना इशारा
गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत सौम्य भूमिका घेणाऱ्या ठाणे पोलिसांनी विसर्जनदिनी मात्र कठोरपणे ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. विसर्जन मिरवणुकीत वाद्ये वाजवताना उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच डॉल्बी किंवा डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ध्वनिमापनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांची विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांत गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे दिसून आले. याप्रकरणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही फारशी प्रभावी कारवाई होत नसल्याचा अनुभव या मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. या पाश्र्वभूवर मंगळवारी निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी जोंधळे हायस्कूलच्या सभागृहात साहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुणगेकर, रामनगरचे वरिष्ठ निरीक्षक पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. या वेळी मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी वेळेत गणपती विसर्जनाला सुरुवात करावी. मिरवणुकीत डॉल्बी, डीजे वाद्यांचा वापर करू नये. ध्वनिप्रदूषण होणार नाही, आवाजाची मर्यादा ओलांडली जाईल, अशी वाद्ये वाजवू नयेत, अशा सूचना केल्या. आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांजवळील यंत्रे मिरवणुकीत कार्यरत असेल. जे मंडळ आवाजाची मर्यादा ओलांडेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे साहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2017 2:23 am