पालिकेतर्फे विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची व्यवस्था; पोलिसांसह निमलष्करी जवानांचाही बंदोबस्त

यंदा १२ दिवस भक्तांच्या घरी मुक्काम करून गणराय आज, मंगळवारी परतणार आहेत. विघ्नहर्त्यांच्या विसर्जनात कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वच प्रशासकीय तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ठाणे शहरात ठिकठिकाणी मंगळवारी सायंकाळी विसर्जन मिरवणुका निघाणार असल्यामुळे पोलिसांसह महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. या मिरवणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील विसर्जन घाटावर तसेच मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, शहरात पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहरात कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून या पर्यावरणस्नेही तलावांच्या परिसरात महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

शहरातील मासुंदा आणि रेवाळे तलाव गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषित होऊ नये यासाठी काही वर्षांपूर्वी दोन्ही तलावांच्या काठावर कायमस्वरूपी विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. तसेच शहरातील अन्य तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून महापालिका गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तलावांची निर्मिती करते. त्यानुसार यंदाही रायला देवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन, हिरानंदानी या भागात महापालिकेने कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर कोपरी, पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत या खाडीकिनारी भागात महाघाट तयार केले आहेत. या सर्वच ठिकाणी गणेशभक्तांना विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी आसनव्यवस्था, वाहनतळ, पाणबुडीपथक, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, विद्युत व्यवस्था आणि प्रसाधनगृह अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. याशिवाय, या भागात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरामध्ये दहा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये आठ पोलीस उपायुक्त, १५ सहायक पोलीस आयुक्त, ११३ पोलीस निरीक्षक, २९६ सहायक आणि उपपोलीस निरीक्षक, ३० महिला सहायक आणि उपपोलीस निरीक्षक, ३१६८ पुरुष कर्मचारी, ८३४ महिला कर्मचारी, ७०० होमगार्ड,  राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या आणि एक शीघ्रकृती दलाची कंपनीचा समावेश आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरामध्ये आज, मंगळवारी ७०१ सार्वजनिक तर ३०३०४ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. ठाणे शहरातील १०५ सार्वजनिक तर ५४९० घरगुती, भिवंडी शहरात १३३ सार्वजनिक तर २५६५ घरगुती, कल्याण-डोंबिवली शहरात १७२ सार्वजनिक तर १०५५६ घरगुती, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर शहरात १२९ सार्वजनिक तर ६२४५ घरगुती गणेशमूर्तीचा समावेश आहे.

ठाण्यातील वाहतूक बदल

  • नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहने. टीएमटी, एनएनएमटी तसेच खासगी बसगाडय़ांना विटावा येथे प्रवेश बंद करण्यात आली आहे. ही वाहने ऐरोली, मुलुंड, आनंदनगर चेकनाका मार्गे ठाण्यात वळविण्यात येणार आहेत. तर टीएमटी, एनएनएमटी तसेच खासगी बसगाडय़ा विटावा येथूनच प्रवाशांची वाहतूक करणार आहेत.
  • कळवा खाडी पूलमार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना शहरातील गोल्डन डाइज नाका आणि बाळकुम नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून या वाहनांना पूर्व द्रुतगती महामार्गावरून नवी मुंबईमध्ये सोडण्यात येणार आहे.
  • खारेगाव टोल नाकामार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहनेही पूर्व द्रुतगतीमार्गे नवी मुंबई शहरात सोडली जाणार आहेत.
  • पनवेल तसेच कल्याण येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना शीळफाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
  • घोडबंदर येथील गायमुख येथील जकात नाका भागात ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने चिंचोटी नाका- भिवंडी अंजूरफाटा- अंजूर चौक-मानकोलीमार्गे ठाण्यात सोडण्यात येणार आहेत.

तलाव परिसरात वाहनांना मज्जाव

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलाव परिसरात विसर्जन घाट असून या ठिकाणी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे या घाटाकडे जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी रस्त्यावरून या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. रायलादेवी तलावाकडे जाणाऱ्या मॉडेला चेक नाका येथूनच टीएमटीसह अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने सिंधुदुर्ग हॉटेल-जगदाळे ट्रॉन्स्पोर्ट,  शांताराम चव्हाण मार्ग एमआयडीसी येथून वागळे परिसरात वळविण्यात येणार आहेत. परिवहनच्या बसगाडय़ा, खासगी बसगाडय़ा तसेच अन्य वाहनांना कोपरी सर्कलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.