• गणेश विसर्जनानिमित्त वसईमध्ये चोख पोलीस बंदोबस्त
  • ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी डीजेवर बंदी
  • राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक सज्ज
  • विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही, टेहळणी मनोरे

विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पार पडावी आणि वाहतूकी कोंडी होऊ  नये यासाठी पोलिसांनी मंगळवारी विसर्जन मिरवणुकीला रस्त्यात थांबवण्यास मनाई केली आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ‘डीजे’लाही मनाई करण्यात आली आहे. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवले आहेत.

सार्वजनिक आणि काही घरगुती गणपतींचे मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी सोमवारी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना विविध सूचना केल्या. अनेकदा विसर्जन मिरवणूक रस्त्यात एकाची ठिकाणी बराच वेळ थांबते. कार्यकर्ते आणि भाविक रस्त्यात नृत्य करतात. एक मिरवणूक थांबली की त्यामागच्या सर्व मिरवणुका थांबतात आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंगळवारी कुठल्याही मिरवणुकीला रस्त्यात थांबण्यास मनाई करण्यात आल्याचे नालासोपारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले. अनेकदा या मिरवणुका रस्त्यात अर्धा ते एक तास विनाकारण थांबतात. त्यामुळे विसर्जनासाठी विलंब होतो आणि वाहतूक कोंडी होते. यासाठी ही सूचना दिल्याचे ते म्हणाले.

वसईतील गणपतींचे विसर्जन

  • २८६ सार्वजनिक
  • ३,६५३ घरगुती
  • ६० विसर्जन स्थळे
  • ७०८ पोलीस कर्मचारी तैनात

ध्वनिप्रदूषण केल्यास कारवाई

डीजेच्या मर्यादित आवाजाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी दिली होती, मात्र विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे पालन होत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे मिरवणुकीत  डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे. कोणत्याही मंडळाने डीजेचा वापर केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

शहरात विशेष पोलीस बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी शहरात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन विभागीय पोलीस उपअधीक्षक, दहा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ६३ पोलीस उपनिरीक्षक आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ५२५ पोलीस कर्मचारी, १०६ गृहरक्षक दलाचे पोलीस, राज्य राखीव पोलीस बलाची एक तुकडी, तीन दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय जागोजागी टेहळणी मनोरे उभारण्यात आले असून शहरात सोमवार रात्रीपासून सर्वत्र नाकाबंदी केली जाणार आहे. बेवारस अवस्थेतील वाहनांनी तपासणी करण्यात येत असून नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आम्ही शहरांत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी खास खबरदारी घेण्यात येत आहे. शहरात नाकाबंदी, मद्यपि चालकांविरोधात मोहीम, बीट मार्शलच्या गस्ती तसेच साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत

रोशन राजतिलक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक,