भाविकांना आकर्षित करण्यासाठी गणेशोत्सव मंडळ विविध युक्त्या लढवून देखावे साकारू लागले आहेत. डोंबिवलीतील गोग्रासवाडी येथील शिवनेरी मित्र मंडळाने यंदा २१ हजार शिसपेन्सिलींपासून गणपती साकारला आहे.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच विविध देखाव्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी गणेशोत्सव मंडळ आकर्षक देखावे साकारत आहेत. डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील अंबिका नगरमधील शिवनेरी मित्र मंडळ गेली पाच वर्षांंहून अधिक काळ असाच वसा जपत आहे. यंदा त्यांनी विद्येची देवता गणराय चक्क शिसपेन्सिलपासून साकारला आहे. शाडूची माती आणि २१ हजार शिसपेन्सिल यापासून बनविलेला हा आठ फुटी आकर्षक गणपती सध्या बच्चे कंपनीपासून सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाची मूर्ती भाईंदर येथील विजय मारवकर यांनी साकारली असून भाविकांचा यंदाही चांगला प्रतिसाद असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गंभीरराव यांनी सांगितले.