दर वाढल्याने दागिन्यांऐवजी सिगारेटवर डल्ला
अंबरनाथ येथील विम्को नाका परिसरातील आयटीसी कंपनीचा टेम्पो अडवून त्यातील दीड कोटी रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स लुटणाऱ्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत सिगारेटचे दर वाढल्यामुळे या टोळीने सोन्याचे दागिने, पैसा तसेच मौल्यवान वस्तूंप्रमाणेच सिगारेटची चोरी सुरू केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत देशभरात अशा प्रकारे सिगारेटचोरीचे ७२ गुन्हे घडले असून त्यामध्ये या टोळीचा काही सहभाग आहे का, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फिरोज रहेमानउद्दीन खान, अब्दुल महंमद शरीफ पठाण, हनीफ अहमद काटील, शेरअली सलीम सैयद, मोहम्मद हनीफ अल्लाबक्ष शेख, आकाश दिगंबर फंड, अशोक लकीप्रसाद चौरासिया, अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. हे सर्व जण अंबरनाथ परिसरात राहणारे आहेत. यांपैकी फिरोज आणि अब्दुल हे दोघे गुन्ह्य़ातील मुख्य सूत्रधार आहेत. तसेच फिरोजला यापूर्वी अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ात अटक झाली होती. अंबरनाथ येथील विम्को नाका परिसरात आयटीसी कंपनी असून तेथून तंबाखूजन्य पदार्थ विविध ठिकाणी पाठविले जातात. १६ डिसेंबर रोजी या कंपनीतून एक टेम्पो सिगारेटचे बॉक्स भरून शिवडी भागात निघाला होता. शीळ-बदलापूर मार्गावरून टेम्पो जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी टेम्पो अडविला. तसेच टेम्पोची धडक बसल्याचा बाहणा करून त्यांनी टेम्पोसह चालकाचेही अपहरण केले. घटनास्थळापासून दोन किलो मीटर अंतरापर्यंत टेम्पो नेऊन त्यांनी चालकास मारहाण करून खाली उतरविले. चालक खाली उतरताच त्यांनी टेम्पोसह पलायन केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने या गुन्ह्य़ाचा समांतर तपास करून या टोळीला गजाआड केले. हनिफ याने टेम्पोवर नजर ठेवून त्याची माहिती साथीदारांना पुरविली होती तर शेरअली आणि मोहंमद या दोघांनी टेम्पो अडवून लुटला होता. तसेच अशोक चौरासिया हा व्यापारी असून त्याने टोळीकडून कमी दराने सिगारेटचा ऐवज विकत घेतला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
सिगारेटऐवजी तंबाखूचा टेम्पो लुटला..
काही महिन्यांपूर्वी या टोळीने सिगारेटचे बॉक्सचा टेम्पो लुटण्याऐवजी तंबाखूच्या पाकिटांनी भरलेला टेम्पो लुटला होता. मात्र, सिगारेटच्या तुलनेत तंबाखूच्या पाकिटांमागे फारसे पैसे मिळत नसल्यामुळे त्यांनी हा टेम्पो सोडून दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. सिगारेट तयार केल्यापासून तीन महिन्यांत त्याचा विक्रीसाठी संपविणे कायद्यानुसार आवश्यक असते. हे लक्षात आल्याने चोरटय़ांनी हा साठा लागलीच बाजारात निम्या किमतीत विक्रीसाठी आणला.