पोलिसांची विशेष मोहीम; दोनपेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्यांना तडीपार करण्याचा निर्णय

वसई-विरार शहरात सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला असून गेल्या वर्षांच्या तुलनेत सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. यामुळे आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत, अशा सोनसाखळी चोरांना तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी, दरोडय़ांबरोबरच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीने उच्छाद मांडलेला आहे. यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चालू वर्षांत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत पालघर जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चोरण्याचे १०१ गुन्हे घडले होते. त्यापैकी ९० गुन्हे वसई-विरार शहरातच घडलेले आहेत. मागील वर्षी २०१७ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत सोनसाखळी चोरीचे ५८ गुन्हे होते. म्हणजे यावर्षी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात ३२ ने वाढ झालेली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलिसांना अपयश आल्याने मासिक गुन्हे बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. यामुळे आता पोलिसांनी सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी कंबर कसली आहे, अशी माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना या धार्मिक प्रार्थनास्थळांजवळ अधिक घडल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता या चोरांना पकडण्याबरोबरच पोलिसांनी महिलांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनसाखळी चोरीची गुन्हे तात्काळ दाखल करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. सोनसाखळी चोर गुन्ह्यासाठी रेसर मोटारसायकलींचा वापर करतात. त्यामुळे अशा मोटारसायकलींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. वाहनांचा वेग वाढवण्यासाठी सोनसाखळी चोर मोटारसायकलींमध्ये बदल करून घेतात. त्यामुळे गॅरेजचालकांना अशा लोकांची माहिती पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेगाने मोटारसायकली चालवणाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. सराफ दुकानदारांना सोनसाखळी विकण्यासाठी आलेल्या संशयित लोकांची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

पोलीस काय करणार?

* ज्या ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात, अशा नियमित जागा म्हणजे ‘हॉट स्पॉट’ पोलिसांनी शोधले असून तिथे नियमित पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

* यापूर्वी ज्यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केलेले आहेत अशा आरोपांवर खास लक्ष ठेवले जाईल.

* सोनसाखळी चोरांच्या कार्यपद्धतीचा पोलीस अभ्यास करत आहेत.

* ज्यांनी दोन वेळा सोनसाखळी चोरीचे गुन्हे केलेले आहेत, त्यांना शहरातून हद्दपार केले जाणार आहे.

* शहरात नाकाबंदी करून पोलीस गस्ती वाढवण्यात येणार आहे.