डोंबिवली रेल्वे स्थानक आता गर्दीचे ठिकाण झाले आहे. ठाणे आणि मुंबईतील स्थानकांप्रमाणेच गर्दीचे धक्के खात स्थानकातून बाहेर पडण्याची कसरत डोंबिवली स्थानकातही करावी लागते. या धकाधकीच्या जीवनप्रवासातून विसावा मिळावा, यासाठी स्थानकापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर काही गृहसंकुले उभारण्यात आली आहेत, तर काही उभारली जात आहेत. या धावपळीच्याजीवनातून विसावा मिळून त्यातून पुन्हा ताजेतवाने व्हावे असे वाटत असेल तर डोंबिवली पश्चिमेकडील सखाराम गृहसंकुलात सहज फेरी मारायला हरकत नाही. येथील रहिवासी नेहमीच हा अनुभव घेत आहेत.

गंगामाई, सखाराम कॉम्प्लेक्स, डोंबिवली (प)

डोंबिवली पश्चिमेला गजबजलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर सखाराम नगर ठिकाणी सखाराम संकुल वसले आहे. अंदाजे २५ ते ३० एकर जागेत २६ इमारतींचा हा गृहप्रकल्प १९९० मध्ये पूर्णत्वास आला. १९९० पूर्वी हा परिसर दलदलीचा होता. काही ठिकाणी शेतीही केली जायची. डोंबिवली नगरपालिका असल्यामुळे निधीअभावी अनेक सुविधांची येथे वानवा जाणवत असे. बांधकाम व्यावसायिक तुळशीराम सखाराम जोशी यांनी सखाराम गृहसंकुलाची उभारणी केली. वडील सखाराम यांचे जीवनात आदराचे स्थान असल्याने त्यांच्या नावे संकुलाची पायाभरणी करून २६ इमारती उभ्या केल्या. त्यातील पाच विंगच्या दोन इमारती या तुळशीराम जोशी यांच्या मातोश्री गंगामाई यांच्या नावाने ओळखल्या जातात. संकुलात इमारतींची संख्या जरी जास्त असली तरी जागेचा विस्तार मोठा असल्याने आणि त्या नियोजनबद्ध बांधण्यात आल्याने इमारतींची तशी गर्दीही जाणवत नाही. या सोसायटय़ांची मिळून एक फेडरेशनही येथे कार्यरत आहे.
सखाराम निवासी संकुलातील ‘गंगामाई’च्या सावलीत दोन इमारती सामावल्या गेल्या आहेत. या इमारतीत ६३ सदनिका आहेत. मराठी आणि त्यातही कोकणी समाजाचे प्राबल्य असून त्यांच्यासोबत दाक्षिणात्यांचीही संख्या लक्षणीय आहे. १९९७ मध्ये सोसायटी स्थापन झाली आणि इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा कारभार सोसायटीकडे आला. कल्याण-डोंबिवली महापालिकेची ओसी, सीसी मिळालेली ही संकुलातील पहिली सोसायटी असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी सांगितले. संकुलातील २६ इमारतींपैकी गंगामाईच्या पाच इमारतींचे वेगळेपण असे की, या इमारतींना स्वतंत्र असे आवार आहे. संकुलातील इतर इमारती या रस्त्याच्या बाजूला आणि एका रेषेत आहेत; परंतु गंगामाईच्या इमारतींना स्वतंत्र आवार असल्याने त्याचे वेगळे सौंदर्य न्याहाळता येते. अशोक, नारळ, आंबा, बदाम आदी झाडांप्रमाणे फुलझाडेही येथे आढळतात. सोसायटीत येण्या- जाण्यासाठी स्वतंत्र असे प्रवेशद्वार आहे. फेरीवाले, अनोळखी व्यक्तींना येथे प्रवेश दिला जात नाही. तशी सूचनाच त्यांनी प्रवेशद्वारावर लावली आहे. आवारात भरपूर मोकळी जागा आहे. त्या जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो. वाहनतळासाठी पुरेशी जागा असून इमारती या इंग्रजी यू अक्षराप्रमाणे उभारल्या गेल्याने संकुलात प्रवेश करताच गंगामाई सोसायटी प्रथम दृष्टीस पडते. तळ अधिक तीनमजली इमारतीत राहणारे सर्व रहिवासी हे मध्यमवर्गीय आहेत. सर्वाच्या सुखदु:खात सहभागी होऊन अडीअडचणीला सामोरे जाणारे येथील रहिवासी हा एका कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर तो सोसायटी परिवारात सामावला गेलेला एक सदस्यच आहे. वाढदिवस, साखरपुडा, हळदीकुंकू, तसेच स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम होऊ शकतील, अशी जागा सोसायटीच्या इमारतीच्या आवारात तसेच गच्चीवर आहे. तेथे कार्यक्रम उत्साहात होत असतात.
दोन वॉर्डात विभागणी
पूर्वी सखाराम नगर एका वॉर्डात येत होते, परंतु आता दोन वॉर्डात विभागले गेले आहे. संकुलात मोठय़ा प्रमाणात मोकळी जागा आहे. येथे महापालिकेचे आरक्षित खेळाचे मैदान आहे. उद्यानही महापालिकेने बांधले आहे. त्याचा विकास व्हावा, असे येथील रहिवाशांना वाटते. कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पाण्याचे नियोजन, पावसाचे पाणी संकलन, जॉगिंग ट्रॅक आदी अनेक प्रकल्प राबविले जावेत, अशी येथील रहिवाशांची इच्छा आहे. फेडरेशनचे चांगले काम सुरू आहे. या कामासाठीही फेडरेशनने पुढाकार घ्यावा असे त्यांना वाटते. संकुल दोन वॉर्डात विभागले गेल्याने या दोन्ही वॉर्डातील लोकप्रतिनिधींना या संकुलाचा विकास करताना एकमेका साहय़ करू.. हे धोरण अवलंबिणे गरजेचे आहे. ते अवलंबिल्यास संकुलाचा विकास आणि रहिवाशांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे सहज शक्य आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
गंगामाई सोसायटीत महत्त्वाचे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. होळी, गणेशोत्सव आणि अय्यपा उत्सव संपूर्ण संकुलात मोठय़ा उत्साहाने साजरा होतो. या उत्सवात सर्वच रहिवाशी सहभागी होत असतात. संकुलात क्रिकेटचे सामनेही भरविले जातात. त्याचप्रमाणे वाढदिवस, साखरपुडा, स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात येतात. कार्यक्रमासाठी मंचही तयार करण्यात आला आहे. १९९५ नंतर महापालिकेकडे कारभार आल्यानंतर पुढील काळात अनेक सुविधांचा येथे विकास झाला. वाहतूक व्यवस्था, रुग्णालये, वैद्यकीय दवाखाने, दुकाने, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये या सार्वजनिक सुविधा येथे प्राप्त झाल्यामुळे रहिवाशांना १९९५ पूर्वीचा समस्यांचा विसर पडला असून येथे राहण्याचे समाधानही त्यांच्या बोलण्यातून ते व्यक्त करीत आहेत.

हलाखीची पाच वर्षे
सखाराम संकुल १९९० च्या सुमारास अस्तित्वात आले. त्या वेळी पाणी, रस्ते, वीज आदी अत्यावश्यक सेवांची दैना होती. सलग पाच वर्षे ही दीनवाणी अवस्था रहिवाशांनी अनुभवली. कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली, परंतु या पालिकेवर १९९५ पर्यंत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे विकास खुंटला होता. तुरळक मनुष्यवस्ती आणि रस्त्यावर दिवे नसल्यामुळे स्थानकापासून संकुलापर्यंत ये-जा करताना वाटसरूंना भीती वाटत होती. वाहतुकीची साधनेही तुरळक होती. पाणी असूनही त्याचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला रहिवाशांना नेहमी सामोरे जावे लागत असे. संकुलाच्या बाहेरून काढण्यात आलेला मोठा नाला आणि त्यापासून निर्माण होणारी दरुगधी रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करणारी होती. ११९५ ला महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून येथे हळूहळू सुविधा येऊ लागल्या. पाणी, रस्ते, विजेचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात मिटला. मोठे गटार बंदिस्त झाल्यामुळे होणाऱ्या दरुगधीपासून रहिवाशांची सुटका झाली. वाहतुकीची व्यवस्था निर्माण झाली. डोंबिवली आणि कोपर स्थानक यांच्या मधोमध सखाराम संकुल असल्यामुळे या दोन्ही स्थानकांवरून संकुलात येणे शक्य झाले. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून भागीदारीत रिक्षा प्रवास नाही. २० रुपयांत सखाराम नगरला जाता येते, परंतु रेल्वे स्थानकात जाताना ८ रुपयांत भागीदारीत रिक्षा प्रवास करता येतो. कोपर स्थानकावरून रिक्षा मिळत नसल्याने डोंबिवली स्थानक रहिवाशांना सोयीस्कर पडते. मात्र, कोपर स्थानकावरून चालत १० मिनिटांत संकुलात पोहोचता येते. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी येथे वॉर्डासह संकुलात लावलेली झाडे आता रहिवाशांना सावली देत आहेत. सांडपाण्यासाठी संकुलात पूर्वी टाक्या बसविण्यात आल्या होत्या, परंतु राणे यांनी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी मलवाहिन्या टाकल्यामुळे टाक्यांच्या जागेचा वापर इतर कामांसाठी करणे संकुलाला शक्य झाले आहे, अशी माहिती अनंत सावंत यांनी दिली.
तरीही संकुल सुरक्षित
सखाराम संकुलाला आज २५ वर्षे होऊन गेली आहेत. या संकुलात कोणतीही सीसीटीव्ही यंत्रणा अथवा सुरक्षारक्षक तैनात नाही. असे असतानाही येथे चोरी, मारामारी किंवा इतर िहसक प्रकार घडले नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सचिव शंकर परब यांनी सांगितले आहे.
suhas.dhuri@expressindia.com