News Flash

बोलीभाषेतील नाटकांची स्पर्धा घ्यावी!

गंगाराम गवाणकर यांची सूचना, ९६ व्या नाटय़संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

बोलीभाषेतील नाटकांची स्पर्धा घ्यावी!
गंगाराम गवाणकर

गंगाराम गवाणकर यांची सूचना, ९६ व्या नाटय़संमेलनाचे दिमाखात उद्घाटन
महाराष्ट्र शासनाने विविध बोलीभाषांतील लेखकांना त्यांच्या भाषेतील नाटक लिहायला भाग पाडून बोलीभाषांतील नाटकांच्या स्पर्धेचे आयोजन करावे. त्याचे पालकत्व नाटय़ परिषदेने घ्यावे आणि विजेत्या नाटकांचे सबंध महाराष्ट्रभर प्रयोग करावेत, अशी सूचना ठाणे येथील ९६ व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
झपाटय़ाने बदलत आणि बहरत असलेली सांस्कृतिक नगरी म्हणजे ठाणे! आज ज्या ठाणे शहरात हे संमेलन भरत आहे त्याच्या जवळच दिवा परिसरात काही वष्रे मी वास्तव्याला होतो. ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’ या माझ्या दोन्ही नाटकांचा जन्म हा इथलाच. तेव्हापासून या शहराशी माझं नाते जुळले आहे. ही नगरी आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. अशा या नगरीत भरलेल्या पहिल्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली, हे माझे परमभाग्यच!, असे भावनिक उद्गार गवाणकर यांनी काढले. त्यांनी आपल्या लिखित भाषणात रंगभूमीशी संबंधित अनेक विषयांना स्पर्श केला. प्रत्यक्ष संमेलनात मात्र त्यांनी आपल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या जन्मापासून त्याच्या यशस्वी प्रवासाचे रसाळ आख्यानच लावले. आपले विचार मी लिखित भाषणात मांडले आहेत, असे सांगून त्यांनी संक्षिप्त उत्स्फूर्त ‘व्हाया वस्त्रहरण’ हा कार्यक्रमच सादर केला. मालवणी भाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकामुळेच मला या खुर्चीचा मान मिळाला, असे ते म्हणाले.
बालरंगभूमीपासून ते हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक, संगीत रंगभूमी आदी रंगभूमीच्या सगळ्या प्रवाहांचा ऊहापोह आपल्या भाषणात केला. बालरंगभूमी बाळसेदार होण्यासाठी पहिल्या इयत्तेपासूनच नाटय़विषय हा अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा. या वयातच त्यांच्यावर नाटय़संस्कार केले तर त्यांच्यात सभाधीटपणा येईल आणि त्यांना रंगमंचाचा सरावही होईल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुलांना हा विषय शिकविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनाच त्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ‘आज जे नराश्य आपल्या संगीत रंगभूमीच्या बाबतीत जाणवते आहे, ते काही अंशी भाषांतरित आणि रूपांतरित नाटकांच्या बाबतीतही आहे.
परकीय कल्पनेवर आधारित नाटकांना जे महत्त्व आपल्याकडे मिळायला हवे तेवढे मिळत नाही.जागतिक रंगभूमीचा विचार केला तर परदेशी रंगमंचावर काय चालले आहे, हे आपल्याला कळायला हवे. आपल्या रंगभूमीवर आपण कुठले नवीन प्रयोग आणि विचार मांडतोय हेही तिथपर्यंत पोहचायला हवे. याला पर्याय एकच.. आदानप्रदान,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मालवणी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि ‘वस्त्रहरण’ची पताका सातासमुद्रापार फडकवणारा माझा मित्र मिच्छद्र कांबळी दुर्दैवाने आज आपल्यात नाही याची मला खंत वाटते आहे. मूळ ‘वस्त्रहरण’मधील अनेक कलावंतही आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ते आज या संमेलनाला हजर असते तर त्यांनाही सार्थक वाटले असते, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 2:45 am

Web Title: gangaram gavankar drama competition
Next Stories
1 ठाणेकर नाटय़रंगात रंगले..
2 मुंबईत मराठी रंगभूमीचे संग्रहालय उभारणार
3 नाटय़ दिंडीत उत्साह
Just Now!
X