ठाणे :  ठाणे, कळवा, भिवंडी आणि शिळफाटा भागात वृद्धांना बतावणी करत त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या इराणी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये अशा प्रकारच्या आठ घटना घडल्या असून त्यामध्ये या टोळ्यांनी एकूण ८ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी या टोळ्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

करोना टाळेबंदीच्या काळात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये चोरी तसेच इतर गुन्ह्य़ांमध्ये घट झाली आहे. परंतु याच कालावधीत वृद्धांना बतावण्या करत त्यांच्याकडील ऐवज लुटण्याचे प्रकार वाढू लागल्याचे समोर आले आहे. ठाणे, कळवा, भिवंडी आणि शिळ-डायघर भागामध्ये गेल्या दोन महिन्यात अशाप्रकारचे आठ गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्य़ात टोळीतील भामटय़ांनी ५५ ते ६५ वयोगटातील नागरिकांना बतावणी करत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजेच चार घटना कळवा परिसरात घडल्या आहेत. निजामपुरा, भिवंडी शहर, शिळ-डायघर आणि श्रीनगर या चार पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एका गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

या टोळीतील भामटे दुचाकीवरून रस्त्यांवर सावज शोधत फिरत असतात. वृद्ध व्यक्ती एकटी दिसल्यानंतर ते त्यांच्याजवळ जातात आणि विविध प्रकारची बतावणी करून त्यांच्याकडील ऐवज लुटून पोबारा करतात. अशी या टोळीची कार्यपद्धत आहे. ‘एका श्रीमंत व्यक्तीला मुलगा झाल्याने तो गरीबांना मोफत अन्नधान्य आणि साडय़ांचे वाटप करत आहे. गरीब वाटण्यासाठी तुम्ही गळ्यातील सोन्याचे दागिने पिशवीत काढून ठेवा’, ‘टाळेबंदीमुळे पुढे नाकाबंदी सुरू आहे. आम्ही पोलीस आहोत. तुमचे दागिने आमच्याकडे द्या’, अशी बतावणी हे भामटे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे प्रकार इराणी टोळ्यांकडून होत असल्याचे समोर येत आहे. असे प्रकार घडू नयेत. यासाठी समाजमाध्यमांद्वारे आम्ही जनजागृती करत आहोत. पोलिसांची पथकेही गस्ती घालत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत या टोळीविरोधात कारवाई करण्यासाठी आढावा बैठक घेणार आहोत.

– संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे