19 September 2020

News Flash

भाजपमध्ये गुंडगर्दी कायम!

शिंदे याच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.

कुख्यात गुंड मयुर शिंदे याने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला.

कुख्यात गुंड मयूर शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये; राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

उल्हासनगरमध्ये पक्षाच्या प्रचारफलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कलंकित नेते पप्पू कलानी यांचे छायाचित्र झळकावून वादात सापडलेल्या भाजपमध्ये गुंड व गुन्हेगारांना प्रवेश देण्याचे सत्र कायम आहे. ठाणे आणि मुंबई परिसरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला कुख्यात गुंड मयूर शिंदे याने मंगळवारी रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे याच्या प्रवेश कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे जातीने हजर होते, हे विशेष!

सावरकरनगर परिसरात दहशत गाजविणारा शिंदे यापूर्वी मुंबईत शिवसेनेच्या एका आमदाराचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जात असे. या आमदाराचा वरदहस्त असल्याने शिवसेनेच्या तिकिटावर ठाणे महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळेल असा दावा त्याचे समर्थक करत होते. मात्र, शिवसेनेने त्यास उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने लागोलाग त्याला पावन करून घेत सावरकरनगर, इंदिरानगर, रुपादेवी पाडा या परिसरातील आपल्या उमेदवारांची ‘ताकद’ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे याच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.

गुंडांच्या पक्ष प्रवेशामुळे राज्यभर भाजपची कार्यपद्धती वादात सापडली असून याच मुद्दय़ावरून महापालिका निवडणुकीत शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने अन्य पक्षातील आजी-माजी नगरसेवकांना गळाला लावत पक्षात प्रवेश दिला. तसेच काही कलंकित नेत्यांनाही पक्षात प्रवेश देण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, पक्षांतर्गत विरोधामुळे कलंकित नेत्यांचा पक्षप्रवेश रखडला. ठाण्यातील भाजपचे काही उमेदवार एका कुख्यात गुंडाने ठरविल्याचा आरोप मध्यंतरी पक्षातील निष्ठावंतांच्या एका गटाने नुकताच केला होता. असे असताना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असली तरी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाची मालिका अजूनही सुरूच आहे.

मयूर शिंदे कोण?

  • ठाणे येथील सावकरनगर भागात मयूर शिंदे राहात असून त्याच्या नावावर मुंबई आणि ठाणे परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचे प्रयत्न, धमकाविणे, खंडणी, गोळीबार अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.
  • भांडुप परिसरात त्याची स्वत:ची टोळी आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने कांजुरमार्ग येथील एका ठेकेदाराला मारहाण करून त्याच्याकडे खंडणी मागितली होती. तसेच भांडुप येथील सोनापूर भागातील वाहतूक पोलीस चौकीमध्ये धिंगाणा घातला होता. याप्रकरणीही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
  • गेल्या काही महिन्यांपासून तो ठाणे परिसरात सक्रिय झाला आहे. यंदा ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ आणि १५ मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी तो इच्छुक होता. मात्र, शिवसेनेने त्याला उमेदवारी नाकारल्याने त्याने आता भाजपमध्ये उडी घेतल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:32 am

Web Title: gangster in bjp
Next Stories
1 सेनेविरुद्धच्या प्रचारात राष्ट्रवादीचे ‘झुरळ’
2 निवडणूक कामांमुळे पालिकेच्या तिजोरीला ओेढ
3 उल्हासनगरात तिरंगी लढत
Just Now!
X