नियम डावलून ठाण्यातील रस्त्यांवर गणेश मंडळांचे अतिक्रमण

ठाणे शहरातील सण-उत्सवांच्या मंडप उभारणीसाठी पालिकेने ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी मंडप तपासणी सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. परंतु, ही समिती नेमून पंधरवडाही उलटत नाही तोच गणेशोत्सवासाठी रस्ते व पदपथ अडवून मंडप उभाण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात हेच चित्र पाहायला मिळाले. तर, आता गणेशोत्सवाच्या दहा दिवस आधीपासूनच रस्त्यांवर बांबू व ताडपत्रीचे सांगाडे उभे राहू लागले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ठाणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचेच नेते आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या पाठीमागेच असलेल्या रस्त्यावर राष्ट्रवादीप्रणीत संघर्ष मंडळाने गणेशोत्सवासाठी रस्त्यावर भलामोठा मंडप उभारला असून दरवर्षीप्रमाणे येथे वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागातील मोकळ्या जागेत यापूर्वी गणेशोत्सव साजरा व्हायचा. पण, त्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्यामुळे नाइलाजास्तव रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे. ही जागा कुणाच्या मालकीची नसून त्या ठिकाणचे अतिक्रमण पालिकेने काढले तर रस्त्यावर उत्सव साजरा करायची वेळ येणार नाही, असे मंडळाकडून सांगण्यात आले. तसेच रस्त्यावरील मंडपासाठी पालिकेकडून परवानगी घेण्यात येते, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

ठाणे येथील किसननगर भागातील अंतर्गत रस्त्यावरील निम्म्याहून अधिक जागेत गणेशोत्सवासाठी मंडप उभारला असून यामुळे नागरिकांना चालण्यासाठी केवळ निमुळता मार्ग शिल्लक राहिला आहे. मनोरमानगर आणि मानपाडा या भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर दुर्गा मित्र मंडळाने गणेशोत्सवासाठी मंडप उभारला असून त्यासाठी रस्त्याचा अर्धा भाग व्यापण्यात आला आहे. या मंडळाने मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदून त्यात बांबू रोवले आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा होत आहे.

खेवरा सर्कलचा जाच टळला

गेल्यावर्षांपासून गणेशोत्सवासाठी रस्ता अडवून भलामोठा मंडप उभारणारे खेवरा सर्कल येथील गणेशोत्सव मंडळ अखेर वठणीवर आले असून त्यांनी यंदा नियमाप्रमाणेच उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी या मंडळाने ४० मीटर रुंदी जागेमध्ये मंडप उभारला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला. यंदा मात्र २५ मीटर रुंदी आणि ६० मीटर लांबी या जागेत मंडप उभारला आहे. त्यामुळे हा मंडप नियमातील परवानगीनुसार असल्याचा दावा मंडळाने केला आहे.

पालिकेचे मंडप धोरण

  • तात्पुरत्या मंडप उभारणीसाठी संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचा परवाना बंधनकारक.
  • उत्सवाच्या ३० दिवस आधी साहाय्यक आयुक्तांकडे अर्ज करणे सक्तीचे.
  • तात्पुरत्या स्वरूपातील मंडपचा स्थळदर्शक नकाशा, बांधकामाची लांबी, रुंदी, उंची दर्शविणारा आराखडा सादर केल्यानंतरच मंडप उभारणीची परवानगी.
  • मागील वर्षी ज्या जागेवर मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली होती, त्याच जागेवर नवीन धोरणानुसार परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, त्यात प्रशासकीय आवश्यकतेनुसार ठाणे महापालिका त्यात योग्य बदल करू शकतात.
  • ३० फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंडपांची उंची २५ फुटांपेक्षा जास्त असल्यास रचना स्थिरता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
  • मंडप किंवा व्यासपीठ उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे खणण्यास बंदी. खड्डे आढळल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपये दंड.
  • परवानगी कालावधी संपताच मंडप हटवणे आवश्यक.

वाहतूक व्यवस्थेचे नियम पायदळी

रस्त्यावर मंडप व परवानगी देताना पुरेसा योग्य तो रस्ता वाहनांना व पादचाऱ्यांना उपलब्ध होईल, याची खबरदारी घेण्याच्या सूचना धोरणामध्ये दिल्या आहेत. तसेच पुरेसा योग्य तो रस्ता उपलब्ध नसेल तर वाहनांना व पादचाऱ्यांना चलनवलनामध्ये अडथळा होणार नाही, असा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे. सार्वजनिक सण व समारंभासाठी रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा आणि रुग्णालय येथे रस्त्यावर मंडपासाठी परवानगी देताना वाहनांच्या व पादचाऱ्यांच्या सुरळीत वर्दळीसाठी पुरेशी जागा उपलब्ध ठेवण्याचे सुचविले आहे.