कल्पेश भोईर

‘एक गाव, एक मिरवणूक एक आरती’ची परंपरा कायम

गणेशोत्सव मिरवणूक म्हणजे कर्णकर्कश संगीत, फिल्मी गाण्यांवर धांगडधिंगा, वाहतूक कोंडी असे चित्र हल्ली पाहायला मिळते. मात्र नायगावच्या जुचंद्र गावातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने  शिस्तबद्ध मिरवणूक काढून नवा आदर्श घालून दिला आहे. ‘एक गाव, एक मिरवणूक एक आरती’ या संकल्पनेवर गेली अनेक वर्षे गावात ही प्रथा पाळली जात आहे.

जुचंद्र या गावात एक गाव एक मिरवणूक आणि एकच सामुदायिक आरती हा उपक्रम  गेली अनेक वर्षे  राबविला जात आहे. सोमवारी हीच परंपरा पाहायला मिळाली.

गावातून एकाच वेळी गौरी, गणपतीची मिरवणूक निघते आणि सगळे त्यात पारंपरिक वेशात सहभागी होतात. मंगळवारी गावाच्या दत्तमंदिराजवळून अशीच मिरवणूक निघाली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि त्यासोबत विविध गणेश गीतांच्या सुरांवटीवर मिरवणकू निघाली. गल्लीगल्लीतून  एक एक  गौरी गणपती त्यात मिरवणूकीत सहभागी होऊ लागले आणि भक्तीरसात भाविक न्हाऊन निघाले. मिरवणूक गावाच्या तलावावर आली. एकच सामुदायिक आरती झाली आणि एकाच वेळी सर्व गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

धार्मिक सेवा मंडळाच्या वतीने गणेश विसर्जनाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने राबविले गेले. लहान मुले, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

या मिरवणुकीच्या वेळी पोलीस बंदोबस्त नव्हता. अध्र्या  तासात गावातील विसर्जन पार पडले व नित्य व्यवहार सुरू झाले. यामुळे कुठलीही वाहतूक कोंडी झाली नाही.