News Flash

विघ्नहर्त्यांच्या राखणीला खासगी सुरक्षारक्षक

गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांचा उत्साह मावळू लागल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे.

उत्सवकाळात चक्क सुरक्षारक्षक नेमून ‘गणपती’वर लक्ष ठेवले जाऊ लागले आहे.

कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे मंडळांचा निर्णय

सामाजिक कार्याचे बाळकडू मिळण्याचे एक प्रमुख ठिकाण अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता कार्यकर्त्यांची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळची आरती, दिवसभर दर्शनासाठी येणारे भाविक यांची व्यवस्था लावताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडू लागली आहे. दिवस कसाबसा निघून जातोही, मात्र रात्रीचा प्रश्न गंभीर ठरू लागला आहे. कारण बहुतेक कार्यकर्ते मंडपात बसून जागरण करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे उत्सवकाळात चक्क सुरक्षारक्षक नेमून ‘गणपती’वर लक्ष ठेवले जाऊ लागले आहे.

लोकमान्य टिळकांनी समाजजागृती आणि प्रबोधनाच्या हेतूने गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले असले तरी आता शंभर वर्षांनंतर तशी परिस्थिती राहिलेली नाही. मात्र गेल्या शतकभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कैकपटींनी वाढली. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी मूळ मित्रमंडळांमधून वेगळ्या स्वतंत्र गणेशोत्सव मंडळांची स्थापना केली. नव्या गृहनिर्माण संकुलांनीही हौसेने गणपती बसविले.

मात्र गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांचा उत्साह मावळू लागल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. टी.व्ही., इंटरनेट आणि आता मोबाइल यामुळे प्रत्येक जण आत्ममग्न होऊ लागला आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासच्या धबडग्यात उत्सवात सहभागी व्हायला तरुण पिढीला एक तर वेळ नाही, किंवा त्यांना त्यात रस वाटेनासा झाला आहे.

त्यामुळे उत्सवाची परंपरा कशी चालवायची असा प्रश्न मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पडू लागला आहे. पूर्वी रात्रभर मंडळाचे कार्यकर्ते जागरण करायचे. गप्पांचे, पत्त्यांचे डाव रंगायचे. आता तो सारा माहोल संपला आहे. त्यामुळे रात्रीचा नैवेद्य आणि आरती झाली की मंडळात थांबायचे कुणी, असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातून किमान रात्रीच्या पहाऱ्याची जबाबदारी खासगी सुरक्षारक्षकांवर सोपविण्यात येऊ लागली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सारी मदार कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. कार्यकर्ते हा या चळवळीचा प्राण आहे. मात्र आता आमच्या मंडळासारखे काही मोजके अपवाद वगळता अन्य मंडळांना कार्यकर्त्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातूनच पैसे देऊन व्यक्ती नेमून कामे करावी लागत आहेत.

– संदीप वैद्य, ज्येष्ठ कार्यकर्ते, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली

 

ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव

ठाणे-             १४०

भिवंडी-         १५६

कल्याण-     २९१

उल्हासनगर-३०५

वागळे इस्टेट-२०५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:24 am

Web Title: ganpati mandal hired private security guard to manage crowd
Next Stories
1 श्वान निर्बिजीकरण बंद!
2 काय..कसं काय वाटलं पोलीस ठाणं तुम्हाला?
3 शहापूर-कसारापर्यंत लोकल सुरू होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार
Just Now!
X