भाजी मंडई म्हटले की विविध भाजी विक्रेत्यांचा भला मोठा समूह प्रत्येकाचा समज असतो. मात्र ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईचे चित्र यापेक्षा वेगळे असून नव्याने उभ्या राहिलेल्या इमारतीमध्ये भाजीपेक्षा अन्य वस्तूंचे विक्री करणारे विक्रेतेच अधिक आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची भाजी किंवा भाज्यांच्या किमतींचे वेगवेगळे पर्यायच उपलब्ध होत नाहीत. परिणामी नागरिकांना नाइलाजाने दुसऱ्या मंडईची वाट धरावी लागते. या मंडईत काही गाळ्यांमध्ये भाजी विक्री केली जात असली तरी त्यांच्या किमतीही चढय़ा असतात. नवी इमारत असल्याने इथे स्वच्छता चांगली असली तरी या भागात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची मात्र निराशा होते. त्याच वेळी याच मंडईच्या आजूबाजूच्या तसेच स्थानकाकडील पदपथांवर मोठय़ा प्रमाणात भाजी विक्री करताना दिसून येतात. त्यामुळे नागरिकांसाठी बांधलेल्या भाजी मंडईचा केवळ दुरुपयोगच होत आहे.

गलिच्छ जागा, भाज्यांचा कचरा आणि छोटय़ा टपऱ्यांमधून मुक्ती मिळवीत गावदेवी भाजी मंडळी एका सुसज्ज इमारतीमध्ये हलवण्यात आली. गावदेवी मंदिराच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये नव्याने सुरू झालेल्या या मंडईमुळे नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आणि स्वस्त भाज्या उपलब्ध होतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ती सपशेल फोल ठरली. कारण नव्याने बांधण्यात आलेल्या मंडईमध्ये भाजीच्या दुकानांऐवजी कपडे आणि अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांची संख्याच जास्त आहे. पूजेचे साहित्य, धूप, अगरबत्त्या, कपडे, महिलांचे कपडे, कापड विक्रेते यांची रेलचेल मोठी आहे. त्यामुळे या भागात भाजी खरेदी करण्यासाठी यायचे की अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

एक तपानंतर मंडई सुरू

गावदेवी मैदानाला लागूनच ही ६० वर्षे जुनी मंडई आहे. मंडई वाढत जाऊन मैदानाचा भाग व्यापू लागला होता. त्यामुळे महापालिकेने येथील राखीव भूखंडावर मंडई उभारण्याचा निर्णय घेतला. २००३ च्या सुमारास त्याच्या कामाला सुरुवात झाली. या वेळी तळमजल्यावर ८० गाळे बांधण्यात आले. परंतु प्रत्यक्षात १५४ गाळेधारक असल्याने उर्वरितांनी या नव्या मंडईत बसण्यास विरोध केला. त्यामुळे सर्वच विक्रेते जुन्या जागेत व्यवसाय करीत होते. सुमारे दहा वर्षे हे गाळे धूळ खात पडून होते. त्यानंतर जागा वाढवण्याच्या दृष्टीने १८ महिन्यांत ४ कोटी ८५ लाखांचा खर्च करून वाढीव इमारत साकार झाली. अखेर सगळी कामे पूर्ण करून दोन मजली मंडईमध्ये गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाले. गेल्या वर्षी या गाळेधारकांनी या इमारतीचा ताबा घेतला.