फलाट आणि लोकल गाडय़ांमधील वाढलेल्या अंतराचे संकट अजूनही कायम असून बुधवारी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथे झालेल्या अशाच एका अपघातामुळे १८ वर्षीय शुभम चव्हाण या विद्यार्थ्यांला आपला पाय गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकात गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या अशाच अपघातांमध्ये दोन जण ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या ठाणेपल्याड असलेल्या स्थानकांमध्ये अपघातांची संख्या वाढत असताना फलाट आणि गाडीच्या पोकळीमध्ये पडून अपघातग्रस्त होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दिवा स्थानकात झालेल्या अपघातामध्ये वर्षां चव्हाण या महिलेचा मृत्यू ओढवला आहे. वसईला राहणाऱ्या वर्षां कोकणातून घरगुती समारंभ आटोपून राज्यराणी एक्स्प्रेसने पती व मुलांसह ठाण्याकडे येत होते. दिवा स्थानकात गाडीचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी तिथे उतरण्याचा प्रयत्न करत होते.
 दिवा स्थानकातील फलाटांची उंची आणि अंधार यामुळे अंदाज न आल्याने चव्हाण पोकळीमध्ये पडल्या. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला, तर कळवा स्थानकात झालेल्या अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मुंब्रा स्थानकातील अपघातामध्ये उषा जाधव या पोकळीत पडून गंभीर जखमी झाल्या आहेत. बुधवारी रात्री ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर झालेल्या अपघातामध्ये शुभम चव्हाण हा १८ वर्षांचा तरुण पोकळीमध्ये पडून जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय निखळला आहे. त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून पायाच्या दुखापतीची कोणतीच कल्पना त्याला अजून दिली गेली नाही.
दरम्यान, फलाटांची उंची वाढवण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने फलाटावर रेती, सिमेंट आणि लाद्यांचे ढीग साठले आहेत. त्यातून प्रचंड धूळ उडत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत खासदार आणि आमदारांसह एका शिष्टमंडळाने स्थानाकांना भेटी दिल्या; परंतु रेल्वेप्रशासनाने कामाचा वेग अद्याप वाढवला नसल्याचे दिसत आहे.

काम संथगतीने
पोकळी भरून काढण्यासाठी स्थानकात फलाटांची उंची वाढवली जात असून हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे होणाऱ्या अपघातांची भीषणता वाढत असून मृत्यूंची संख्याही वाढतच आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना देणाऱ्या सुविधांमध्ये कमालाची निष्काळजीपणा करत असून त्याचा त्रास प्रवासी भोगत आहेत. स्थानकातील संथ कामांमुळे  आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या मधू कोटियन यांनी व्यक्त केली आहे.