कल्याण, डोंबिवली शहरातील गॅरेज व दुचाकी विक्रेत्यांचे शहराबाहेर स्थलांतर

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने काही दूरगामी योजनांची आखणी सुरू केली असून शहरातील गॅरेजेस तसेच दुचाकी विक्रेत्यांची दुकाने शहराबाहेर नेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ठाणे वाहतूक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंबंधी सल्लामसलत सुरू करण्यात आली असून अशा पद्धतीचा स्वतंत्र झोन तयार करण्यासाठी जागेची चाचपणी सुरू केली आहे.

कल्याण डोंबिवली  महापालिकेने मध्यंतरी शहरातील वाहतूक तसेच वाहनतळांच्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी मेसर्स आकार अभिनव कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेने कल्याण डोंबिवली तसेच आंबिवली, टिटवाळा, शहाड, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांलगतच्या परिसरात वाहनांचे सर्वेक्षण करून तसेच वाहनांच्या संख्येत २०३६ पर्यंत होणारी वाढ गृहीत धरून विस्तृत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल मध्यंतरी ‘क्रिसिल रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर  सोल्यूशन्स लिमिटेड’ या संस्थेकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यासंबंधीच्या उपाययोजनांची आखणी तीन टप्प्यांत करण्यात आली आहे. आखणीचे एक महत्त्वाचा भाग म्हणून शहरातील दुचाकी विक्रीची दुकाने तसेच गॅरेजेस शहराबाहेर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडूनही यासंबंधी अभिप्राय घेण्यात येत असून लवकरच यासंबंधीची कार्यवाही सुरू केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांसाठी एकत्रित बाजारपेठ

डोंबिवलीतील मानपाडा रस्ता, टिळक चौक, पेंढारकर मार्ग तसेच कल्याणातील मुरबाड रोड, सिंधी गेट यांसारख्या दाटीवाटीच्या परिसरात मोठय़ा संख्येने गॅरेजेस तसेच दुचाकी विक्रीच्या दुकानांच्या रांगा दिसून येतात. यापैकी काही गॅरेजेस बेकायदा असली तरी त्यावर कारवाई केली जात नव्हती. दुचाकी विक्रीच्या दुकानांमधील विक्रीसाठी ठेवण्यात येणारी वाहने पदपथांवर रचून ठेवली जात असल्याने कोंडीची वाट अधिकच बिकट होत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. हे लक्षात घेऊन महापालिकेने हा सगळा बाजार शहराबाहेर हलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहराबाहेर महापालिकेच्या आरक्षणाच्या काही जागा असून त्या ठिकाणी या बाजारांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्यात येणार आहे.