भाईंदर : भाईंदर पश्चिम परिसरातील महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाणपोईभोवतीच कचऱ्याचे डबे ठेवण्यात आल्याने दुर्गंधी तसेच अस्वच्छतेमुळे नागरिक तेथे पाणी पिण्याचे टाळत आहेत.

भाईंदर पश्चिम परिसरात महानगरपालिका मुख्यालय कार्यालय आहे. तसेच या भागात भाईंदर पोलीस ठाणे, नाजरत शाळा आणि भाजी बाजार असल्यामुळे या मार्गावर नागरिकांची रहदारी मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे वर्ष २००८ मध्ये पालिकेमार्फत येथे पाणपोईची उभारणी करण्यात आली होती. पाणपोईत थंड पाणी उपलब्ध होत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रवासी वर्ग या पाणपोईवर आपली तहान भागवित होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन वर्षांपासून पाणपोईची दुरवस्था झाली असल्याचे समोर आले आहे.

नागरी वस्तीत पाणपोई असल्यामुळे अनेक लहान मुले या पाणपोईभोवती खेळत असतात. परंतु पाणपोईच्या भोवतीच कचऱ्याचे डबे उभे करण्यात आल्यामुळे नागरिकांकडून आता या भागाचा वापर कचरा टाकण्याकरिता होत आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांना याभोवती थांबणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे कचऱ्याचे डबे हलवून पाणपोईची स्वच्छता करून पुन्हा पाणी उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी परिसरातील दुकानदार करीत आहेत.

त्या पाणपोईचा वापर होत नसल्यामुळे दुरवस्था झाली आहे. परंतु त्याची दुरुस्ती करून खासगी संस्थेला ती चालवण्यास देण्यात येणार आहे.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग