अनेक ठिकाणच्या कुंडय़ा गायब

परिसर स्वच्छ, नीटनेटका राहावा म्हणून वसई-विरार महापालिकेने लाखो रुपये खर्चून ठिकठिकाणी ओला व सुका कचरा संकलनासाठी कचराकुंडय़ा ठेवल्या. मात्र अनेक ठिकाणच्या कचराकुंडय़ा बेपत्ता झाल्या आहेत. भुरटय़ा चोरांनी या कुंडय़ा चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कुंडय़ा नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा साचला असून दरुगधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेने नवीन कचराकुंडय़ा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वसई-विरार हद्दीतील  स्वच्छतेसाठी महापालिकेने अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. ओला-सुका कचरा वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये याचबरोबर कचराकुंडय़ांचा वापर करावा, असे आवाहन पालिका अधिकारी करत आहेत. ओला कचरा ठेवण्यासाठी हिरव्या रंगाचे १५ हजार डबे होते. त्यातील अनेक नादुरुस्त झाले असून आता वापरात एकूण ९ हजार डबे आहेत. सुका कचरा गोळा करण्यासाठी १२  हजार डबे खरेदी केले होते. घरगुती धोकादायक कचरा जमा करण्यासाठी नवे डबे खरेदी करण्याचे  पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने शहरातील कचरा रस्त्यावर विखुरला जाऊ नये, शहर स्वच्छ असावे याकरिता डबे खरेदी करण्याचा विचार केला आहे, मात्र शहरातील कचराकुंडय़ा गायब होत असल्याचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. या आधी गटारावरील झाकणांवर या भुरटय़ा चोरांचा डल्ला होता. ते विकून त्यांना नफा व्हायचा. त्यामुळे आता त्यांनी जागोजागी असलेल्या कचराकुंडय़ांवर डल्ला मारला असून जेणेकरून या प्लास्टिकच्या असलेल्या कचराकुंडय़ा विकूनही मोठय़ा प्रमाणावर नफा मिळवता येईल. कचराकुंडय़ा नसल्याने परिसरातील नागरिक कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथवर टाकत आहेत. कचरा साचल्याने आणि तो उचलला जात नसल्याने दरुगधी पसरली आहे. वसई प्रभाग समिती ‘एच’मध्ये चुळणा रोड येथील कॉम्पॅनिअन्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या समोरील फुटपाथवर ठेवण्यात आलेल्या कचराकुंडय़ा गायब झाल्या असून या ठिकाणी आता फुटपाथवरच कचरा टाकला जात आहे.

ज्या ठिकाणी कचराकुंडय़ा नाहीत, तिथे त्वरित कचराकुंडय़ांची व्यवस्था करावी. ज्यांनी कचराकुंडय़ा गायब केल्या असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

महेश सरवणकर, स्थानिक

कचराकुंडय़ांची चोरी झाली आहे, असे म्हणतात येणार नाही. मात्र या कचराकुंडय़ा गायब झाल्या असून त्याबद्दलची तक्रार महापालिकेतर्फे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सुखदेव दरवेशी, प्रभारी साहाय्यक आयुक्त, महापालिका