वसई-विरार महापालिकेचे निर्देश; नव्या इमारतींना अट बंधनकारक

वसई-विरारमधील प्रत्येक रहिवासी संकुलांना कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावावी लागणार आहे. पालिकेने तसे निर्देश दिले असून यापुढे नवीन इमारतीला परवानगी देताना ही अट बंधनकारक केली जाणार आहे. पालिकेच्या कचराभूमीत पडलेला २ लाख टन कचरा बायोमायनिंग पद्धतीने नष्ट केला जाणार असून त्यानंतर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज आणि खतनिर्मिती केली जाणार आहे.

प्रत्येक मोठय़ा रहिवासी संकुलांना आता यापुढे कचऱ्याची सोसायटीच्या आवारातच विल्वेवाट लावाली लागणार आहे. यापुढे इमारतींना परवानगी देताना तसे निर्देश देऊन बंधनकारक करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सोसायटीच्या आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर प्रत्येक सोसायटीमधील ओला आणि सुका कचरा पालिका गोळा करणार आहे. ४८ घरामांगे एक कचराकुंडी ठेवण्यात येणार असून साडेसहा लाख सोसायटय़ांना अशा कचराकुंडय़ा पालिकेतर्फे पुरवल्या जाणार आहेत. कचराभूमीत कमीत कमी कचरा नेण्यात यावा, असे धोरण आहे. तो पाच ते दहा टक्के कचरा जाईल त्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती आणि खतनिर्मिती केली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

वसईत विरार शहरात दररोज ५३० टन कचरा निर्माण होतो. किती कचरा येतो, त्याची वर्गवारी, प्रमाण, घटक यांचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अहवाल तयार करून शासनाला सादर करण्यात आलेला आहे. पालिकेने ४१३ कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निरी, आयआयटी मुंबई, भाभा अणुसंसाधन केंद्र, एमएमआरडीए, मुंप्रा, पर्यावरण समिती आदी शासकीय संस्थांमधील तज्ज्ञ आणि तांत्रिक सल्लागार यांची समिती तयार केली होती. आयआयटीकडून या प्रकल्पास तांत्रिक मंजुरीदेखील मिळविण्यात आली आहे. या कचऱ्याव्यतिरिक्त २ लाख टन जमा झालेला कचऱ्याची आधी बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. त्याच्या निविदा काढल्या जातील आणि नंतर पुढील प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिली. सिनोव्हा, वेस्टिंग हाऊस, हिताची, जिंदाल एनर्जी, मित्सुबीशी, स्टेफील मॅकलेनन आदी कंपन्यांनी पालिकेचा घनकचरा प्रकल्प राबिवण्याची तयारी यापूर्वीच दर्शवली आहे.

बांधकाम कचराही वेगळा उचलणार

सध्या औद्योगिक कचरा औद्योगिक कंपन्यांना उचलून तो तळोजा येथे न्यावा लागतो. तर वैद्यकीय कचरा वैद्यकीय संघटनेकडून उचलला जातो. शहरात तयार होणार वेगवगेळ्या बांधकामाचा कचरा म्हणजे डेब्रिजचे काय करायचे हा प्रश्न होता. त्यासाठी वेगळ्या निविदा काढून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. ई-कचऱ्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

वीजनिर्मिती, खतनिमिर्तीचे काम रेंगाळले                               

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वसई-विरार महापालिकेने तयार केलेला ४१३ कोटींचा घनकचरा प्रकल्प तयार केला आहे. पालिकेचा प्रकल्प तयार असून या प्रकल्पांतर्गत कचऱ्यापासून वीज आणि खतनिर्मिती केली जाणार आहे. मात्र शासनाने अद्याप सर्व महापालिकांमधील घनकचरा व्यवस्थापनाचे सामायिक धोरण तयार न केल्याने हे काम रेंगाळले आहे.