कल्याण डोंबिवली महापालिकेची हद्द जिथे सुरूहोते, तेथील मानपाडा रस्त्यावरील गांधीनगर नाल्याच्या सीमेवर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. परिणामी, डोंबिवलीकरांचे स्वागतच या कचऱ्याने आणि दरुगधीने होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी वारंवार पत्रव्यवहार करूनही हा कचरा हटत नाही. त्यामुळे नागरिक नाराज आहेत.
मानपाडा रस्त्यावर गांधीनगर नाला असून तेथे बाजूलाच जुना गांधीनगर जकात नाका आहे. नाला ओलांडताच सागांव नांदिवली ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. नाल्याजवळ ग्रामपंचायत भागातील नागरिक, व्यापारी, रुग्णालयांतील कचरा टाकण्यात येतो. बरेच दिवस कचरा उचलला जात नसल्याने परिसरात सतत दरुगधी पसरलेली दिसते. या कचऱ्याजवळच मानपाडा पाल वीज केंद्रातून जाणारी डोंबिवलीला वीजपुरवठा करणारी मुख्य भूमिगत वीज केबल आहे. कचरा सुकल्यानंतर त्याला आग लावली जाते.
यामुळे दोनतीनदा केबल जळल्यामुळे डोंबिवलीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कामावर जाणाऱ्या महिलाही रिक्षातून जाताना येथे कचऱ्याच्या पिशव्या टाकतात. तसेच हा कचरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने महापालिकेचे कर्मचारी कचरा वाहून नेण्यास तयार होत नाहीत. पालिका कचरा उचलत नाही आणि गावकरी कचरा टाकायचे बंद होत नाहीत.
त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना या दरुगधीचा सामना करावा लागत असून शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूसारख्या आजारांची लागण सुरू असताना येथेही ही रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली.

येथील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, प्रभागक्षेत्र अधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्याची कुणीही दखल घेतलेली नाही.
– राजेश पाटील, गांधीनगर प्रभाग नगरसेवक

या भागासाठी दर बुधवारी कचरा वाहून नेणारा डंपर दिला जातो. नागरिकांना अनेकदा सांगूनही काही फायदा होत नाही, गावकरी येथे कचरा टाकतातच. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  
– सुदेश चुडनाईक,आनंदनगर नगरसेवक