भाईंदर : एकीकडे करोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना दुसरीकडे मीरा-भाईंदर शहरामधील काशीनगर भागात जागोजागी कचरा साठत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने हा कचरा साथीच्या रोगांना आमंत्रण देणारा ठरत आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून अधिकाधिक स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु अशा परिस्थितीत नागरिक केवळ आपल्या घराभोवती स्वच्छता राखत असून निघालेला केरकचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. दररोज प्रशासनाकडून कचरा उचलला जात असला तरी नागरिक मोठय़ा प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकून जमा करत असल्यामुळे ये-जा प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या करोनाचे संकट डोक्यावर असल्यामुळे आरोग्य खात्यातील अनेक कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत. त्यात नालेसफाईसारखी कामे शिल्लक राहिल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यावर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे अनेक वेळा कचरा जमा करणाऱ्या गाडय़ा उशिराने येत असल्याचे समोर आले आहे. परंतु कचरा उचलला जाईल या विचाराने अनेक नागरी ओला कचरादेखील सर्रासपणे रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे समोर आले आहे.

भाईंदर पश्चिम परिसरातील काशी नगर भागात इमारतीच्या बाहेर आणि मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढिगारे झाले आहेत. त्यामुळे या ढिगाऱ्यांभोवती डास, कीटकांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांकडूनच स्वच्छता राखली न गेल्यास करोनासह इतर आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

कचरा उचलणारी गाडी रोज येत असली तरी नागरिक परिसरातच कचरा टाकतात. यापुढे कुणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

– संभाजी पानपट्टे,उपायुक्त, महापालिका

या भागातील आतील बाजूस असलेल्या इमारतींचा कचरा येथे साठवला जात असून नंतर उचलला जातो. परंतु त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते.

– चव्हाण, स्थानिक रहिवासी