कचराभूमीवरील आगीच्या घटनांमुळे स्थानिक हैराण

महापालिका निवडणुकांपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी ऐरणीवर आलेला दिव्यातील कचराभूमीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसू लागली असून गेल्या काही दिवसांपासून येथील कचऱ्याला वारंवार आगी लागून लगतच्या नागरी संकुलांमध्ये धुराचे लोट पसरू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. निवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ही कचराभूमी हटविली जाईल, असे आश्वासन दिवेकरांना दिले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा भलताच प्रतिष्ठेचा केला होता. मात्र, निवडणुकांना वर्ष होत आले असताना कचराभूमीच्या धुरात दिवेकर कोंडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दिवा येथील कचराभूमीला सतत आग लागून हा संपूर्ण परिसर धुरात कोंडल्याने या मुद्दय़ावरून या भागातील नागरिक संतप्त होऊ लागले आहते. दिवा येथील कचराभूमीवर ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच आसपासच्या परिसरातील कचरा आणून टाकला जातो. या ठिकाणी कचरा टाकू नये या मागणीसाठी दिवा तसेच आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. ठाणे महापालिकेने या कचराभूमीला पर्याय म्हणून शीळ पट्टय़ात बंद पडलेल्या दगडखाणींची जागा नक्की केली आहे. मात्र, पर्यावरण विभागाच्या काही मंजुऱ्यांअभावी ही जागा अजूनही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे दिव्यातील कचराभूमीवर दररोज कचरा रिकामा करण्याचे प्रकार सुरूच असूनही या ठिकाणी सातत्याने आगी लागत असल्याने दिवा आणि आसपासचा परिसर धूरमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कचऱ्यातील मिथेन वायूचा हवेशी संपर्क आल्याने आग लागते अशी माहिती मुंब्रा अग्निशनम दलाचे केंद्रप्रमुख एम.यू.मुल्ला यांनी दिली. ठाणे महापालिका हद्दीतील जमा होणारा कचरा दिवा परिसरातील खारफुटीच्या भागात आणून टाकला जात आहे. ठाणे महापालिकेला स्वत:ची क्षेपणभूमी नसल्याने खाडी किनारी, खारफुटीच्या भागात हा कचरा टाकला जात आहे.

दिवा येथील खारफुटीवरही अशाच पद्धतीने नव्याने कचराभूमी तयार झाली आहे. या भागात कचरा टाकू नये अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. मात्र महापालिका प्रशासन त्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नाही, असे चित्र आहे.

या भागातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गेले काही दिवस या भागात धुराचे लोट  पसरतात या धुरामुळे परिसरातील लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. अनेकांना दमा,श्वसनाचे विकार जडले आहेत, असे तेथील रहिवासी सुधीर मुंडे यांनी सांगितले.

या क्षेपणभूमीपासून साधारण शंभर फुटांच्या अंतरावर साळवीनगर आहे. या परिसरातील नागरिकांना या धुराचा प्रचंड त्रास होतो.

त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मिटला नाही तर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिवावासीयांनी दिला आहे.