रेल्वे-पालिकेतील असमन्वयामुळे प्रवाशांचे नाक मुठीत

मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक समजल्या जाणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कचरा कोणी उचलायचा, यावरून रेल्वे प्रशासन आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यात विसंवाद निर्माण झाला आहे. स्थानकातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी आमची असली तरी महापालिका हा कचरा उचलत नाही, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर स्थानक परिसरातून गोळा केलेला कचरा आमच्यापर्यंत पोहोचवल्यास आम्ही त्याची विल्हेवाट लावू, अशी पालिका अधिकाऱ्यांची भूमिका आहे. या दोन्ही यंत्रणांच्या वादामुळे स्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून त्यातून नाक मुठीत धरून प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. त्यातच ढीग वाढू नये, यासाठी रेल्वे कर्मचारी कचरा जाळत असल्याने त्या धुराने स्थानकातील प्रदूषणात भर पडली आहे.

एकूण सात फलाट असणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकातील कचरा साफ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमले आहेत. या कंत्राटदाराकडून स्थानक परिसरातून गोळा केलेला कचरा स्थानकाच्या फलाट क्रमांक एकलगत असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो. या ठिकाणाहून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचऱ्याची वाहतूक करावी, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, महापालिका हा कचरा उचलण्यास तयार नसल्याने या स्थानकात दररोज कचराकोंडी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. स्थानकात जमा होणारा कचरा रेल्वेने नेमलेल्या ठेकेदाराने महापालिका हद्दीत आणून सोडावा. त्यानंतरच या कचऱ्याची वाहतूक केली जाईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, फलाट क्रमांक एक येथूनच हा कचरा महापालिकेने न्यावा, असे रेल्वे ठेकेदाराचे म्हणणे आहे. वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या या वादात प्रवाशांची ससेहोलपट होऊ लागली आहे.

स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा सुटतात. या गाडय़ा कल्याण स्थानकातूनच सुटणाऱ्या असल्याने त्यांना स्थानकात जास्त वेळ थांबा मिळतो. अशा वेळी गाडीतील प्रवाशांना जवळच गोळा केलेल्या या कचऱ्याच्या दरुगधीचा, तर कधी कचरा जाळल्यामुळे स्थानक परिसरात होणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागतो. स्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग साचू नयेत यासाठी सातत्याने कचरा जाळला जातो. त्यामुळे हे स्थानक धुरात काळवंडू लागले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून कचरा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणला जात होता. गेल्या काही दिवसांपासून ही वाहतूक रेल्वे ठेकेदाराने बंद केली आहे. रेल्वे प्रशासनाने परिसरातून गोळा केलेला कचरा आमच्यापर्यंत पोहोचवल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल.

ए.एल. घुटे, घनकचरा विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका