कचरापेटीत नियमित कचरा टाकणाऱ्यांना बक्षीस

सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कचरापेटय़ांमध्ये कचरा टाकण्याऐवजी कुठेही टाकण्याच्या नागरिकांच्या सवयीला लगाम घालण्यासाठी ठाणे महापालिकेने आता चक्क बक्षीस योजना जाहीर केली आहे. नियमितपणे कचरापेटीचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी ‘कचरा टाका आणि सोने जिंका’ अशी योजना प्रशासनाने खासगी संस्थेच्या माध्यमातून जाहीर केली आहे. कचरापेटीच्या पडद्यावरील ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून याची नोंद घेऊन त्याआधारे विजेत्याची निवड करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे या भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येते.  गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ रहावीत यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. याशिवाय, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान राबविले जात आहेत. त्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत ठाण्याचा क्रमांक वधारत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरापेटीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी महापालिका प्रशासनाने नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी आधुनिक कचरापेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंगळवारी त्यापैकी पहिल्या कचरापेटीचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

२०० कचरापेटय़ा

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी एकूण दोनशे आधुनिक कचरापेटय़ा ठेवल्या जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर कचरापेटय़ा ठेवल्या जाणार आहेत.

या कचरापेटीसाठी तीन चौरस फुट जागा लागणार असून त्यात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये कचरा साठवणूुकीसाठी पिशवी ठेवण्यात आली असून ती भरल्यानंतर मोठय़ा कचरापेटीत टाकली जाणार आहे किंवा कचरा वाहतूक गाडीतून ती नेली जाणार आहे.

योजना अशी..

  • ठाणे महापालिकेने कचरापेटय़ांची खासगीकरणाच्या माध्यमातून व्यवस्था करताना ‘कचरा टाका आणि सोने जिंका’ अशी स्पर्धाही आखली आहे.
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘टेकबीन’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यावर नागरिकांना जवळच असलेल्या कचरापेटीची माहिती मिळणार आहे.
  • या पेटीत कचरा टाकल्यावर एलईडी पडद्यावर आलेल्या ‘क्युआर कोड’चा अ‍ॅपमधील कॅमेऱ्याने फोटो काढून नागरिकांनी तो कोड टेकबीनच्या सव्‍‌र्हरला पाठवावा. त्यामुळे संबंधित नागरिक टेकबीनचा वापर करत असल्याची नोंद केली जाणार आहे.
  • त्यातूनच संबंधित ठेकेदाराकडून विजेत्यांची निवड करून त्यांना सोन्याचे नाणे बक्षीस रूपात देण्यात येणार आहे.
  • या कचरा पेटीचा जास्तीत जास्त तसेच नियमितपणे वापर केल्यावर अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या सवलतींचा लाभही नागरिकांना मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.