डायघर, आधारवाडीपाठोपाठ तिसऱ्या कचराभूमीला आग

कल्याणमधील आधारवाडी कचराभूमीला लागलेली आग धुमसत असतानाच दिवा येथील कचराभूमीला गुरुवारी सकाळी सवा अकराच्या सुमारास आग लागली. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या प्रयत्नांती ही आग आटोक्यात आणली. दुसरीकडे, डायघर येथील कचऱ्याच्या बाबतीत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रकाशित होताच तेथील कचऱ्यालाही आग लावण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ठाणे शहरातून दररोज गोळा होणारा ७०० मेट्रिक टन कचरा दिव्याच्या कचराभूमीवर टाकण्यात येतो. या कचराभूमीची क्षमता संपली असून या ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध आहे. मात्र, पालिकेकडे दुसरी पर्यायी जागा नसल्याने ठाण्याचा कचरा दिव्यातील कचराभूमीवरच टाकण्यात येतो. या कचराभूमीला आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. मध्यंतरी महापालिका निवडणुकीच्या काळात येथील कचरा प्रश्न सातत्याने चर्चेत होता. मात्र, निवडणुका संपून वर्ष लोटल्यानंतरही कचराभूमीबाबत काहीही घडलेले नाही. वाळलेल्या कचऱ्याला आग लागली की ती लगेच पसरत जाते. अशीच परिस्थिती गुरुवारी उद्भवली

होती. त्यामुळे दिवा शहरातले वातावरण धुरकट झाले होते. कचराभूमीला  लागलेल्या आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

डायघरमध्ये धुराचे लोट

शहराच्या मध्यवर्ती भागात स्वच्छतेची काळजी घेणारे महापालिका प्रशासन दिवा, डायघर या भागातील कचरा व्यवस्थापनाविषयी अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता ठाणे’ने उघडकीस आणल्यानंतर गुरुवारी तो कचरा पेटवून देण्यात आला. त्यामुळे या परिसरात धुरामुळे नागरिकांचा जीव गुदमरला. या कचऱ्यात प्लॅस्टिक मोठय़ा प्रमाणात असल्याने हवा दूषित झाली होती.