डोंबिवलीतील दोन अभियंत्यांकडून यंत्राची निर्मिती; काही प्रभागांत वापर

कल्याण-डोंबिवली शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या मुद्दय़ावर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर काथ्याकूट सुरू असातना दोन अभियंत्यांनी मिळून कचऱ्याचा कूट करून त्याच्या योग्य व्यवस्थापनाचा नवा मार्ग शोधला आहे. एका यंत्राद्वारे कचऱ्याचा कूट केला जाणार आहे.

या यंत्राच्या माध्यमातून शहाळे, ताडफळांची टरफले, झाडाच्या लहान फांद्या, फ्लॉवरचे देठ, फुलांचे हार, मंडईतून बाहेर टाकण्यात येणारा टाकाऊ भाजीपाला, नाशवंत फळे यांचा भुगा करणे शक्य होणार आहे.

डोंबिवलीतील सुधीर काळे व प्रवीण दुधे यांची ही संकल्पना आहे.  घराच्या परिसरात, फूल, फळ, भाजी बाजार, क्रीडांगण, स्मशानभूमी परिसरात तयार होणारा कचरा यंत्रात टाकून कूट करता येईल. हा कचरा पुढे वाळवून तयार होणारे खत पालिकेची उद्याने, बगीचे यांना देता येईल. हे यंत्रे काही प्रभागांमध्ये बसविण्यात आले आहे.

कचऱ्याचा कूट केल्यानंतर तो नगर, जुन्नर परिसरातून रात्रीच्या वेळेत टेम्पोने भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी रिकाम्या टेम्पोतून नेल्यास त्याला खत मिळेल, असे अभियंत्यांनी स्पष्ट केले. गोदरेज समुहातील शून्य कचरा मोहिम ठेकेदाराचे हे यंत्र तयार करताना सहकार्य मिळाले, असे दुधे म्हणाले.

केवळ कल्याण डोंबिवली पालिकाच नव्हे तर राज्यातील २७ पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने या यंत्राचा वापर करावा म्हणून शासकीय स्तरावर प्रात्यक्षिक चाचणी अधिकाऱ्यांसमोर करून दाखविण्यात येणार आहे.

या यंत्रातून  मिनिटाला १५ किलो कचऱ्याचा भुगा केला जातो. तासाभरात सुमारे पाचशे ते सहाशे किलो कचऱ्याचा भुगा करणे शक्य होणार आहे. या कचऱ्यापासून वीटा तयार करणे. प्लॅस्टिकपासून इंधन तयार करणे असे प्रकल्प येणाऱ्या काळात करण्याचा मानस असल्याचे त्यांनी या वेळी ‘लोकसत्ता’शी बोलातना स्पष्ट केले.

यंत्राची वैशिष्टये 

  • तीन गोणी कचरा या यंत्रात टाकल्यावर त्याचा एक गोण भुगा.
  • भुगा करताना आवाज नाही किंवा प्रदूषण नाही.
  • यंत्रातून कचऱ्याचा कुट्टा करण्याची चाचणी पूर्ण.
  • भुगा लवकर वाळण्यासाठी त्यात लाकडाचा भुसा टाकणार.
  • यंत्रात खिळा, दगड अडकू नये म्हणून लोखंडी कंगव्याचे दाते.
  • महिला बचत गट, बेरोजगारांना रोजगाराचे साधन.