27 February 2021

News Flash

पाऊले चालती.. : आरोग्यदायी पहाट

आनंदनगरच्या उद्यानातही अगदी पहाटेपासूनच डोंबिवलीकरांचा राबता सुरू होतो.

आनंदनगर, डोंबिवली (प).

डोंबिवली पश्चिमेतील रहिवाशांना पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी पूर्वी रेतीबंदरला जावे लागे. आता काही विभागात उद्याने विकसित झाली आहेत. आनंदनगर त्यांपैक एक. या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना व्यायामासाठी हक्काची जागा मिळालीच, शिवाय त्यातील काहींना जिवाभावाचे मित्रही लाभले..

‘व्यायामात् लभते स्वास्थ्य दीर्घायुष्यं बलं सुखं। आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्।। डोळ्याच्या विकारामुळे मला नोकरीतून निवृत्ती पत्कारावी लागली, तेव्हा मला या सुभाषिताचे मर्म कळले. त्या दिवसापासून मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो,’ उद्यानात दररोज सकाळी व्यायाम करायला येणारे त्र्यंबक हांडे सांगत होते.

त्र्यंबक हांडे यांच्याप्रमाणेच आरोग्यम् धनसंपदाचे महत्त्व पटणारी अनेक ज्येष्ठ नागरिक डोंबिवली पश्चिम विभागातील आनंदनगर उद्यानात व्यायाम करताना दिसतात. मुसळधार कोसळणारा पाऊस कमी होऊन पहाटेच धुके पडू लागल्याने मॉर्निग वॉकला येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आनंदनगरच्या उद्यानातही अगदी पहाटेपासूनच डोंबिवलीकरांचा राबता सुरू होतो.

तत्कालीन महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्या पुढाकाराने नोव्हेंबर २०१२ मध्ये हे उद्यान विकसित करण्यात आले. त्यापूर्वी महापालिकेच्या ताब्यात असणारी ही जागा पडीक अवस्थेत होती. मलनि:सारण वाहिन्या, बांधकामाची अवजारे, परिसरातील नागरिकांची वाहने इथे ठेवली जात. याशिवाय सदैव या जागेवर अस्वच्छता असे. आनंदनगरवासीयांना फेरफटका मारण्यासाठी एकही ठिकाण नव्हते. त्यामुळे येथील नागरिक मॉर्निगवॉकसाठी रेतीबंदरला जावे लागे. उद्यानामुळे येथील अस्वच्छता दूर झालीच, शिवाय लोकांना विरंगुळ्याचे ठिकाणही मिळाले.

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सुप्रिया सावंत पहाटेच निरनिराळे आयुर्वेदिक रस आणि काढे देतात. आवळा, कारले, तुळस, पुदिना, दुधी आदींचे रस त्यांच्याकडे मिळतात. व्यायामासोबत दिवसाची सुरुवात सकस पेयाने व्हावी, या हेतूने अनेक जण त्याचे सेवन करतात.   उद्यानामध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. इथे १५ ते २० बाके ठेवण्यात आलेली आहेत. ज्येष्ठ नागरिक येथे हलका व्यायाम, जप, ध्यानसाधना करताना दिसतात. काही जण योगसाधना करतात. पहाटे पाच वाजल्यापासून इथे लोक येऊ लागतात. उद्यानाच्या मध्यभागी लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोका ठेवण्यात आला आहे. त्याच्या शेजारीच एक कारंजे आहे. कारंज्याच्या बाजूला असलेल्या कुंपणालगत अनेक जण व्यायाम करताना दिसतात. कारंज्याच्या पुढे नागरिकांना बसण्यासाठी अर्धवर्तुळाकार बैठक बनविण्यात आलेली आहे. येथे दररोज सकाळी ६.३० ते ७.३० प्रेरणा हास्य क्लब चालतो. प्रदीप गांगण या क्लबचे संचालक आहेत. या क्लबमध्ये साधारण शंभर सदस्य आहेत. त्यापैकी किमान ४० ते ५० सदस्य दररोज येथे व्यायाम करताना दिसतात. प्रत्येक जण व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करतात. काही ओंकार साधना करीत असतात. सकाळी नियमितपणे भेट होत असल्याने इथे येणाऱ्या नागरिकांचे एकमेकांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. ते एकत्र भेटतात. सांस्कृतिक कार्यक्रम करतात. या उद्यानाने आम्हाला नवे मित्र, सुहृद मिळवून दिल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करतात.

मला पूर्वी चालताना दम लागत होता. आता या ठिकाणी नियमित येत असल्याने तो त्रास थांबला. मला आता ताजेतवाने वाटू लागले आहे.

रोहित पाटील

उद्यान नव्हते, तेव्हा आम्हाला दररोज रेतीबंदरला जावे लागायचे. आता मात्र आम्हाला आमची हक्काची जागा मिळाली आहे. हे उद्यान बनण्याच्या आधी आम्हाला दररोज रेतीबंदपर्यंत जावे लागे, परंतु आता आमचा त्रास भरपूर कमी झाला आहे.येथे नियमित येऊन व्यायाम केल्यामुळे मन:शांती लाभते

श्रीकांत नंदुरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:15 am

Web Title: garden issue in dombivali reti bandar
Next Stories
1 मिरवणुकांना रस्त्यात थांबण्यास मनाई
2 शहरबात-वसई-विरार : संकल्पचित्र अस्तित्वात येणार?
3 वसईतील ख्रिस्तायण : ख्रिस्ती समाजातील ‘अलम्’
Just Now!
X