वर्षांपासून बेकायदा पार्किंगमुळे बकाल झालेली नितीन कंपनी आणि मानपाडा उड्डाणपुलाखाली महापालिका प्रशासनाने अतिशय सुंदर उद्यान उभारले असून त्यामध्ये विविध खेळांच्या सुविधा, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, फुलझाडे आणि आकर्षक विद्युत रोषणाई अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे ठाणेकरांना आता विरंगुळ्यासाठी नवे साधन उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे, या उद्यानासाठी महापालिकेने एकही पैसा खर्च केला नसून संबंधित ठेकेदाराला जाहिरातीचे अधिकार देऊन उद्यानाची उभारणी केली आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग जातो. या मार्गावर शहरातील आणि शहराबाहेरील वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. ती सोडविण्यासाठी २००४ मध्ये या मार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी या प्रमुख चौकांमध्ये उड्डाणपूल उभारण्यात आले. या उड्डाणपुलांमुळे वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेचा वापर बेकायदा पार्किंग, भंगार वाहनांसाठी होत होता. याशिवाय, या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा अड्डाही झाला होता. त्याचा नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागत होता. बेकायदा पार्किंग, भंगार वाहने आणि गर्दुल्ले यामुळे पुलाखाली असलेला संपूर्ण परिसर अस्वच्छ असल्याचे चित्र होते. तसेच सिग्नलवरील भिकारी शौचासाठीही या जागेचा वापर करायचे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या मोकळ्या जागेवर उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला.

या उद्यानाच्या उभारणीसाठी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पत्रव्यवहार करून उद्यानाच्या प्रकल्पाला परवानगी मिळवली. त्यानंतर एका खासगी कंपनीमार्फत याठिकाणी उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण, चारशे मीटरचा जॉगिंग ट्रॅक, सातशे मीटरचा सायकल ट्रॅक, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी, खानपान व्यवस्था, आकर्षक उद्यान, लॉन टेनिस, पिकल बॉल, मलखांब, स्केटिंग, स्केट बोर्ड, अत्याधुनिक स्वरूपाची क्लायंम्बिग वॉल, आकर्षक विद्युत रोषणाई, महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

मानपाडा पुलाखाली उद्यान

मानपाडासारख्या अतिशय गजबजलेल्या, गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या आणि बकाल अवस्थेत दिसणाऱ्या उड्डाणखालील जागेवरही उद्यान उभारण्यात आले आहे. या ठिकाणी खुली व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, उद्यान, ज्येष्ठ नागरिक कट्टा, आकर्षक विद्युत रोषणाई, पुलाच्या पिलरवर फोकस लाइट्स या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत पार्किंगऐवजी आता तिथे विविध खेळांच्या सुविधा झाली आहे. शौचासाठी वापर करण्यात येणारी जागा आता सुंदर फुलांनी नटली आहे. एरवी कळकट-मळकट अवस्थेत असणारे उड्डाण पुलाचे पिलर्स आता आकर्षक विद्युत रोषणाईने सजले आहेत.