कचऱ्याची दरुगधी नकोशी! पाणीटंचाई, विजेचा लपंडाव आणि अरुंद रस्ते

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील ठाणे पालिका हद्दीतील शीळ, खार्डी, आगासन, दिवा ही गावांतील ग्रामस्थ कचऱ्याच्या दरुगधीने त्रस्त आहेत. तसेच रस्ते, पाणीटंचाई, विजेचा लपंडाव, अरुंद रस्ते हे प्रश्नही सुटलेले नाहीत. यामुळे उपजीविकेसाठी धावपळ करायची की या सुविधा मिळत नसल्याने रडत बसायचे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

कल्याण-शिळफाटा, मुंब्रा-शिळफाटा या रस्त्यांच्या कडेला असलेल्या या गावांत आजही नागरी समस्या गंभीर आहेत. दिवा गावातील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही या भागात राजरोस बेकायदा बांधकामे सुरू आहेत. बांधकामांसाठी शेतजमिनीचा वापर केला जात आहे. रस्त्यांच्याकडेला बांधण्यात येणारे गाळे रस्त्यासाठी सामासिक अंतर न ठेवता बांधले जात आहेत.

दिवा भागात अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहनांमुळे वर्दळ, बाजाराची सुविधा नसल्याने रस्त्यावरच भाजी, मासळी बाजार भरत आहेत. गॅस सिलिडरच्या टाक्या रस्त्यावर ढीग करून ठेवल्या जात आहेत. वस्ती वाढते त्याप्रमाणात महावितरणकडून वीजपुरवठय़ाच्या सुविधा दिल्या जात आहेत. परंतु, वीजवाहक वाहिन्या विजेच्या खांबावरून दिल्या जात असल्याने विजेच्या खांबांवर वीजवाहक वाहिन्यांचे गठ्ठे तयार झालेत. या जिवंत वाहिन्यांजवळून पादचारी, विद्यार्थी जात असतात. त्यांना धक्का लागण्याची भीती आहे. या वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी रहिवाशांची आहे. दिवा गावात बाजारपेठेत जागोजागी कचरा, अस्वच्छता आहे.

दिवा-खार्डी गावांच्या दरम्यान ठाणे पालिका हद्दीत कचराभूमी आहे. या कचराभूमीचे सतत सपाटीकरण सुरू असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत असह्य दरुगधी याभागात पसरते. या कचराभूमीला दिव्यातील रहिवाशांचा विरोध आहे. अनेक धनदांडग्या विकासकांनी या भागात संकुल बांधली आहेत. परंतु, या भागातील नागरी सुविधांचा अभावामुळे नोंदणी केलेल्या रहिवाशांनी सदनिका घेतलेल्या किमतीपेक्षा कमी भावात विकून किंवा भाडय़ाने देऊन आपल्या मूळ ठिकाणी पळ काढला आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

खार्डी गावात रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यालगत शिळफाटा आहे. तरीही मागील २५ वर्षांत या भागातील रस्ते रुंद करण्यात आले नाहीत. गावात लाकडाच्या वखारी आहेत. पावसात कुजलेले लाकूड. त्यावर तयार झालेले डास व जीवजंतू गावात शिरकाव करतात. खार्डी गावातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शिळफाटा रस्त्याला वाहतूक कोंडी झाली की अनेक वाहन खार्डी गावातून दिवा बाजूने कल्याण दिशेकडे निघतात. त्यामुळे या गावांच्या हद्दीत बाहेरील वाहनांमुळे कोंडी होते. या भागात विकास आराखडय़ातील अनेक रस्ते आहेत. ते बेकायदा बांधकामांनी गिळंकृत करण्यापूर्वी पालिकेने विकसित करण्याची या भागातील रहिवाशांची मागणी आहे.

पावसाळ्यातही पाणीटंचाई

या तिन्ही गावांमध्ये जागोजागी सार्वजनिक ठिकाणी नळांना भांडी रांगेत लावून ठेवण्यात आल्याची दिसतात. एवढी पाणीटंचाई या भागात पावसाळ्यात दिसून आली. दिवा गावातील २०० हून अधिक बेकायदा इमारतींना चोरून वीजपुरवठा, चोरून पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील मूळ निवासी रहिवाशांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे.