सुरतहून तळोजाकडे अमोनिया गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरला मुंब्रा बायपासजवळ अपघात होऊन मोठय़ा प्रमाणावर गॅसगळती झाली. यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. १४५० टन अमोनिया गॅस असलेला टँकर मुंब्रा बायपासवरून जात असताना टोल नाका येथे उलटला. याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात काही समजत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. तसेच सैनिकनगर, कौसा भागातील रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून अन्यत्र हलविण्यात आले होते. सकाळी ६ च्या सुमारास क्रेन लावून टँकर हलविण्याचा प्रयत्न केला असता टँकरचा वॉल्व्ह निघाला आणि गॅसगळती होण्यास सुरुवात झाली. यामुळे दीपक फर्टिलायझर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाहणीसाठी बोलाविण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अपघातामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र सकाळी ८ नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.