मिथुन राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्कावर्षांव पाहण्याची पर्वणी शुक्रवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे. पृथ्वी ही ‘फेथन ३२००’ या लघुग्रहाच्या मार्गातून जाणार असल्याने हा उल्कावर्षांव पाहायला मिळणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

पृथ्वी ही जेव्हा एखाद्या धूमकेतूच्या मार्गातून जाते तेव्हा उल्कावर्षांव पाहायला मिळतो. शुक्रवारी पृथ्वी ‘फेथन ३२००’ या लघुग्रहाच्या मार्गातून जाणार असल्याने मिथुन राशीतून ‘जेमिनिड’ हा उल्कावर्षांव होणार आहे. या उल्कावर्षांवाच्या दरम्यान ताशी २० उल्का पडणार आहेत. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी अनोखी पर्वणी असून हा उल्कावर्षांव खुल्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

तसेच २६ डिसेंबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून ते दक्षिण भारतातील कोईम्बतूर आणि उटकमंड या ठिकाणाहून कंकणाकृती आकारात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा ७८ टक्के भाग हा चंद्राने झाकला जाणार असून या सूर्यग्रहणाचे निरीक्षण करणे ही दुर्मीळ संधी आहे, असेही दा.कृ.सोमण यांनी सांगितले. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक खगोलप्रेमी हे दक्षिण भारतात जाणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.