तीन महिन्यानंतरही प्लास्टिक बंदी वाऱ्यावर

प्लास्टिक बंदीला तीन महिने होऊनही वसई-विरार शहरात ही बंदी असल्याचे दिसून येत नाही. किरकोळ विक्रेते, ग्राहकांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असून त्यांवर महापालिका प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली होती. या बंदीला तीन महिने पूर्ण झाले. मात्र त्याचा वसई-विरार शहरात फज्जा उडाला आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असलेला पाहायला मिळत आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी व कागदी पिशव्या वापरण्यात याव्या, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. फेरीवाले, भाजीवाले, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांच्या मार्फत प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेने सुरुवातीला प्लास्टिक बंदीविरोधात मोहीम राबवली होती, मात्र ती थंडावली असल्याचे चित्र आहे.

ग्राहकच आमच्याकडे प्लास्टिक पिशवीची मागणी करतात. परंतु जर पिशवी नसेल तर काहीही न घेता निघून जातात. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे, असे विरारमधील विक्रेते अनुप शहा यांनी सांगितले. सुरुवातीला बंदी आणल्यावर जनतेने मनावर घेतलेले, पण आता मात्र बिनधास्त पिशव्या मागितल्या. आता प्लास्टिकच्या पिशव्या बाळगल्या तरी त्यावर कुणीही कारवाई करत नाही, असे संतोषी कनोजिया या भाजीविक्रेत्या महिलेने सांगितले.

अजूनही बाजारात प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत आहे. या पिशव्या फेरीवाल्यांपर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे बंदी असूनही काही उपयोग होत नाही. प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक, किरकोळ विक्रेते, मच्छी-मटण विक्रेते यांना जनजागृतीसाठी पत्रकही वाटण्यात आले होते. पालिकेकडून एक महिना प्लास्टिक वापराला सवलत असल्याचे जाहीर झाले होते, मात्र आतापर्यंत एक महिन्याची सवलत निघून गेल्यानंतरही अजूनही प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. पालिका प्रशासन कारवाईसाठी पुढे येत नसल्याने प्लास्टिक बंदीचा शहरात फज्जा उडाल्याचे दिसत आहे. स्वच्छता निरीक्षकांवर महापालिकेने कारवाईची जबाबदारी दिली होती. आपापल्या प्रभागात प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर त्यांच्यावरच कारवाईचा इशारा दिला होता. मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

प्लास्टिक बंदीच्या विरोधात स्वच्छतेच्या दृष्टीने मी स्वत: महापालिकेचे पावतीबुक घेऊन प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. महापालिकाही या विषयावर कारवाईसाठी काम करत आहे.

– सुखदेव दरवेशी, साहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग